Jay Shah Latest News : कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून तिसऱ्यांदा आयपीएलचा किताब जिंकला. आयपीएल विजेत्या संघाला बक्षीस म्हणून २० कोटी रूपये मिळाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंसोबत ग्राउंड स्टाफ आणि क्युरेटर्स यांना देखील चांगले मानधन दिले आहे. (IPL 2024 Updates) बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा करताना पडद्यामागील हिरोंवर पैशांचा वर्षाव केला आहे. आता ग्राउंड स्टाफच्या कर्मचाऱ्यांना २५-२५ लाख रूपये मिळणार आहेत. ही रक्कम १० मैदानातील कर्मचाऱ्यांना मिळेल. तर तीन अतिरिक्त स्टेडियममधील कर्मचाऱ्यांना देखील चांगले मानधन मिळणार आहे. (IPL 2024 Final)
जय शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'च्या माध्यमातून मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, यशस्वी ट्वेंटी-२० लीग (आयपीएल २०२४) करण्यात काही पडद्यामागील हिरोंचा हात आहे. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यासाठी ग्राउंड स्टाफच्या कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी खराब वातावरण असताना चांगली खेळपट्टी तयार केली. १० नियमित आयपीएल स्टेडियममधील ग्राउंड स्टाफ आणि क्युरेटर यांना २५-२५ लाख रूपये दिले जातील. तर तीन अतिरिक्त मैदानातील कर्मचाऱ्यांना १०-१० लाख रूपये मिळतील. त्यांचे कष्ट आणि मेहनतीसाठी त्यांचे धन्यवाद.
आयपीएल विजेत्या संघासह उपविजेत्या संघावर देखील पैशांचा वर्षाव झाला. आयपीएल विजेत्या केकेआरच्या संघाला २० कोटी रूपये मिळाले. तर उपविजेत्या हैदराबादच्या संघाला बक्षीस म्हणून १२.५ कोटी मिळाले. तिसऱ्या स्थानी राहिलेल्या राजस्थान रॉयल्सला ७ कोटी आणि चौथ्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ६.५ कोटी रूपये मिळाले.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील केकेआरने अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा दारूण पराभव केला. एकतर्फी झालेल्या सामन्यात केकेआरने मोठा विजय मिळवून किताब जिंकला. सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने स्फोटक खेळी केली. केकेआरचा संघ सर्वप्रथम २०१२ मध्ये आयपीएलचा चॅम्पियन झाला होता. त्यानंतर २०१४ आणि २०२४ मध्ये त्यांना किताब जिंकण्यात यश आले. केकेआरने गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोनदा आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली एकदा आयपीएल जिंकली.