AB de Villiers On Starc And Cummins : मंगळवारी दुबईत आयपीएलचा मिनी लिलाव पार पडला अन् ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला. आयपीएलच्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पैशांचा पाऊस झाला. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला तब्बल २०.५० कोटी रूपयांत सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीने आपल्या संघाचा भाग बनवले. कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. पण, अवघ्या दीड तासात चित्र बदलले अन् मिचेल स्टार्कवर ऐतिहासिक बोली लागली. आयपीएल २०२४ साठी मंगळवारी दुबईत मिनी लिलाव पार पडला. कमिन्स आणि स्टार्कशिवाय इतरही परदेशी खेळाडूंनी बक्कळ कमाई केली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पैशांचा पाऊस झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने आश्चर्य व्यक्त केले.
आयपीएल लिलावानंतर त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना डिव्हिलियर्सने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. अशातच एका चाहत्याने डिव्हिलियर्सला मुंबई इंडियन्सच्या लिलावाच्या रणनीतीबद्दल प्रश्न विचारला. या चाहत्याने विचारले की मुंबईने लिलावात चांगले निर्णय घेतले का? यावर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज म्हणाला, "त्यांनी काही चांगल्या बोली लावल्या. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि इतर काही संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आले आहेत. ते लिलावात देखील चांगले निर्णय घेतात. या फ्रँचायझी हुशारीने खेळाडूंची निवड करतात, भावनिक होऊन निर्णय घेत नाही. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क हे खरोखरच अप्रतिम खेळाडू आहेत पण खरंच त्यांची एवढी किंमत आहे का?."
लिलावात वेगवान गोलंदाजांना मोठी मागणी - डिव्हिलियर्स
तसेच या लिलावात वेगवान गोलंदाजांना मोठी मागणी होती. कमिन्स आणि स्टार्कवर ज्याप्रकारे फ्रँचायझींनी पैसा ओतला त्यावरून गोलंदाजांचे महत्त्व कळते. या वर्षी लिलावात वेगवान गोलंदाजांची मागणी सर्वाधिक होती. त्यामुळे या खेळाडूंवर एवढी विक्रमी बोली लागली असावी, असे डिव्हिलियर्सने सांगितले.
मिचेल स्टार्कची ऐतिहासिक कमाई
वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क कोणत्या संघात जाणार याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले होते. स्टार्कसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोठी चुरस झाली. यॉर्कर किंगला आपल्या संघाचा भाग बनवण्यासाठी दोन्हीही फ्रँचायझींनी मोठी रक्कम मोजण्याची तयारी दाखवली. दिल्लीने माघार घेतल्यानंतर केकेआरने यात उडी घेतली. मग गुजरात टायटन्सने देखील स्टार्कला खरेदी करण्यासाठी रस दाखवला. केकेआर आणि गुजरातच्या फ्रँचायझीने मोठी रक्कम मोजण्याची तयारी कायम ठेवली अन् १४ कोटींवर बोली गेली तरी स्टार्क लिलावाच्या रिंगणात कायम राहिला. आकडा २० कोटीवर गेला तरी बोली चालू होती. केकेआरने अखेर तब्बल २४.७५ कोटीत स्टार्कला आपल्या संघाचा भाग बनवले. यासह स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. २०१५ नंतर तब्बल आठ वर्षांनंतर स्टार्कचे जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगमध्ये पुनरागमन झाले आहे.
Web Title: IPL 2024 Former South African player AB de Villiers has given his first reaction after Pat Cummins fetched Rs 20.50 crore and Mitchell Starc Rs 24.75 crore in the IPL auction
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.