Gautam Gambhir LSG KKR, IPL 2024 : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेला IPL स्पर्धेतील वाद सर्वांना लक्षात असेलच. नवीन उल हक जेव्हा लखनौ सुपर जायंट्स संघातून खेळत होता, तेव्हा विराटची त्याच्याशी बाचाबाची झाली. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स संघाचा मार्गदर्शन या नात्याने गौतम गंभीर भांडणात मध्यस्थी करायला आला, पण विराट आणि गंभीर यांच्यातच वाद झाला. स्पर्धा संपेपर्यंत त्यांच्यातील ही 'टशन' कायम राहिली. मात्र आज गौतम गंभीरने एक महत्त्वाची घोषणा केली. ज्या पदावर असताना विराटशी त्याचा वाद झाला, त्या पदावरूनच गंभीर पायउतार झाला आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाचे पद त्याने सोडले असून आता तो नव्या भूमिकेत दिसणार आहे.
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आता कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक असेल. याआधी तो लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या मेंटरची भूमिका बजावत होता. आयपीएल 2023 च्या समाप्तीनंतर, गौतम गंभीरने शाहरुख खानची भेट घेतली, ज्यानंतर तो KKR साठी महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. ती चर्चा खरी ठरली असून तो आता KKR साठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणार आहे.
KKR CEO वेंकी म्हैसूर यांनी आज जाहीर केले की माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीर KKR मध्ये "मार्गदर्शक" म्हणून परत येत आहे आणि मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यासोबत तो संघासाठी काम करेल. लखनौ सुपर जायंट्सचे मेंटॉरशिप सोडल्यानंतर गौतम गंभीरनेही एक भावनिक संदेश शेअर केला. "मला लखनौचे खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि संघाशी संबंधित सर्वांचा पाठिंबा मिळाला. मी डॉ. संजीव गोयंका (लखनौ संघाचे मालक) यांचे आभार मानू इच्छितो. गंभीरने पुढे लिहिले - डॉ. गोएंका यांचे नेतृत्व उत्कृष्ट होते, मला आशा आहे की लखनौ संघ भविष्यातही चांगली कामगिरी करेल आणि त्यांच्या खेळीचा चाहत्यांना अभिमान वाटेल. संघाला शुभेच्छा!
गौतम गंभीरने केकेआरला दोनदा चॅम्पियन बनवले
गंभीर 2011 ते 2017 या काळात KKR कडून खेळला. या काळात केकेआर संघाने दोनदा विजेतेपद पटकावले. KKR पाच वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरले आणि 2014 मध्ये चॅम्पियन्स लीग T20 च्या अंतिम फेरीतही पोहोचले.