नवी दिल्ली - स्थानिक पंजाबी बागचा २१ वर्षांचा मयंक यादव एका रात्रीत आयपीएलचा नवा स्पीडस्टार बनला. आयपीएल १७ मध्ये पंजाबविरुद्ध लखनौकडून १५५.८ किमी ताशी वेगाने चेंडू टाकून क्रिकेट जाणकारांचे लक्ष वेधले. गल्लीबोळात क्रिकेट खेळणारा हा युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान गोलंदाज बनण्याची मनीषा बाळगत आहे. मयंकची संघर्षमय वाटचाल फारच खडतर ठरली.
त्याचे वडील प्रभू यादव मूळचे बिहारमधील सुपौलचे. वयाच्या १८ व्या वर्षी ते दिल्लीला आले. हॉटेल आणि चहाच्या टपरीवर भांडी धुतल्यानंतर अंडी वितरणाचेही काम केले. भाड्याच्या घरात वास्तव्य. मोठी मुलगी आणि त्यानंतर मयंक या दोन मुलांचा खर्च झेपत नसल्याने त्यांनी कारमधील घड्याळ बनविण्याचे काम सुरू केले. त्यात अपयश आल्यानंतर ॲम्ब्युलन्स आणि पोलिस व्हॅनसाठी सायरन बनविण्याचे काम करतात.
मयंक चार वर्षांचा असताना वडिलांनी त्याला क्रिकेटसाठी प्रोत्साहन दिले. सुरुवातीला जोडे घेऊन देण्यास अडचण असायची, पण न डगमगता त्यांनी गल्लीबोळात वेगवान गोलंदाजी करणाऱ्या मयंकला क्लब क्रिकेटकडे वळविले. सडपातळ असलेल्या मयंकच्या कौशल्याला तारक सिन्हा आणि देवेंद्र शर्मा या प्रशिक्षकांनी आकार दिला.
सुरुवातीला १४० किमी ताशी वेगाने चेंडू टाकणारा मयंक आता बुलेटच्या वेगाने मारा करीत आहे. तो लवकरच राष्ट्रीय संघात दिसेल, असा विश्वास या दोन्ही प्रशिक्षकांसह प्रभू यादव यांना आहे.