IPL 2024 GT vs CSK Live Match Updates In Marathi । अहमदाबाद : शुबमन गिलच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सनेचेन्नई सुपर किंग्सचा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. 'करा किंवा मरा'च्या सामन्यात विजय मिळवण्यात यजमान गुजरातला यश आले. चेन्नईकडून मिचेल मार्श (६३) आणि मोईन अलीने (५६) चांगला संघर्ष केला. पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. मोहित शर्माच्या घातक गोलंदाजीसमोर चेन्नईच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. त्याने सर्वाधिक (३) बळी घेऊन संघाच्या विजयात मोठा हातभार लावला.
गुजरातने दिलेल्या २३२ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांना घाम फुटला. इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपात आलेल्या अजिंक्य रहाणेला १ धाव करून तंबूत परतावे लागले. त्यानंतर रचिन रवींद्र (१) ऋतुराज गायकवाड (०), शिवम दुबे (२१), रवींद्र जडेजा (१८) आणि मिचेल सँटनरला खातेही उघडता आले नाही. अखेर चेन्नईचा संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद केवळ १९६ धावा करू शकला अन् सामना ३५ धावांनी गमावला. अखेरच्या काही चेंडूंमध्ये धोनी शो पाहायला मिळाला. त्याने ११ चेंडूत ३ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद २६ धावा कुटल्या. यासह त्याने आयपीएलमध्ये २५० षटकार मारण्याची किमया साधली. खरे तर गुजरातच्या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे स्पर्धेतील आव्हान कायम आहे.
तत्पुर्वी, गुजरातकडून साई सुदर्शन आणि शुबमन गिल या दोघांनीही शतकी खेळी करून आपल्या संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. गिल पाठोपाठ सुदर्शनने देखील शतकाला गवसणी घातली. बळी घेण्यासाठी तरसलेल्या चेन्नईला अखेर १८ व्या षटकात साई सुदर्शनच्या रूपात पहिला बळी मिळाला. त्याला तुषार देशपांडेने बाद केले. ७ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने सुदर्शनने अवघ्या ५१ चेंडूत १०३ धावा कुटल्या, तर शुबमनने ५० चेंडूत शतक पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासातील १०० वे शतक म्हणून गिलच्या अप्रतिम खेळीची नोंद झाली. गिलने ५५ चेंडूत ६ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. गुजरातने निर्धारित २० षटकांत ३ बाद २३१ धावा केल्या, त्यामुळे चेन्नईला विजयासाठी २३२ धावांची गरज होती, ज्याचा पाठलाग करताना चेन्नईला अपयश आले.
गुजरातचा संघ -
शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, शाहरूख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी.
चेन्नईचा संघ -
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग.
Web Title: IPL 2024 GT vs CSK Live Match Updates In Marathi Gujarat Titans beat Chennai Super Kings by 35 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.