IPL 2024 GT vs CSK Live Match Updates In Marathi । अहमदाबाद : 'करा किंवा मरा'च्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या सलामीवीरांनी स्फोटक खेळी करताना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना घाम फोडला. गुजरातचा कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन या सलामी जोडीने धावांचा पाऊस पाडला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी चांगली सुरुवात केली. साई आणि शुबमन यांनी सुरुवातीपासूनच स्फोटक खेळी करून १६ षटकांत १७९ धावा कुटल्या. (IPL 2024 News)
साई सुदर्शन आणि शुबमन गिल या दोघांनीही शतकी खेळी करून आपल्या संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. गिल पाठोपाठ सुदर्शनने देखील शतकाला गवसणी घातली. बळी घेण्यासाठी तरसलेल्या चेन्नईला अखेर १८ व्या षटकात साई सुदर्शनच्या रूपात पहिला बळी मिळाला. त्याला तुषार देशपांडेने बाद केले. ७ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने सुदर्शनने अवघ्या ५१ चेंडूत १०३ धावा कुटल्या, तर शुबमनने ५० चेंडूत शतक पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासातील १०० वे शतक म्हणून गिलच्या अप्रतिम खेळीची नोंद झाली आहे. गिलने ५५ चेंडूत ६ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या.
आयपीएलच्या सतराव्या हंगामातील ५९ व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी गुजराजचा विजय एक सुखद धक्का देणारा असेल. पण चेन्नईच्या विजयाने त्यांची डोकेदुखी वाढणार आहे. १२ गुणांसह चेन्नईचा संघ चौथ्या स्थानावर तर ८ गुणांसह गुजरात तळाशी आहे. (GT vs CSK live Score IPL 2024) आजच्या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
गुजरातचा संघ -शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, शाहरूख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी.
चेन्नईचा संघ -ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग.