Rahul Tewatia Shubman Gill R Sai Kishore, IPL 2024 GT vs PBKS: कर्णधार शुबमन गिलची (३५) संयमी खेळी आणि राहुल तेवातियाचा (३६*) फिनिशिंग टच याच्या बळावर गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा ३ गडी राखून पराभव केला. पंजाबच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पण कर्णधार हा निर्णय फलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. प्रभसिमरन सिंगची (३५) सावध फलंदाजी आणि हरप्रीत ब्रारचा (२९) काऊंटर अटॅकमुळे पंजाबने कशीबशी १४२ पर्यंत मजल मारली. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची फलंदाजीही फारशी चांगली झाली नाही. पण अखेर ५ चेंडू शिल्लक ठेवून गुजरातने सामना जिंकला आणि गुणतालिकेत ८ गुणांसह सहावे स्थान पटकावले.
१४३ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात संघाने चांगली सुरुवात केली. वृद्धिमान साहाने १३ धावा केल्या. त्यानंतर शुबमन गिल आणि साई सुदर्शन दोघांनी चांगली खेळी केली. शुबमन गिल ३५ आणि साई सुदर्शन ३१ धावा करून बाद झाले. त्यानंतर गुजरातचा डाव काहीसा अडखळला. डेव्हिड मिलर ४ धावांवर, अझमतुल्ला उमरझई १३ धावांवर, शाहरूख खान ८ धावांवर बाद झाला. मात्र राहुल तेवातियाने एक बाजूने झुंज दिली. तो २६ धावांवर नाबाद राहिला. त्यानेच विजयी चौकार मारत संघाला २ गुण मिळवून दिले.
सलामीवीर सॅम करन आणि प्रभसिमरन सिंग यांनी पॉवरप्ले मध्ये अर्धशतकी भागीदारी केली. पण प्रभसिमरनच्या विकेट नंतर पंजाब एक्सप्रेस रुळावरून घरसली. संघाच्या ५२च्या धावसंख्येवर प्रभसिमरन (३५) बाद झाला. पाठोपाठ सॅम करनदेखील २० धावांवर तंबूत परतला. त्यानंतर रॅली रुसो (९), जितेश शर्मा (१३), लियम लिव्हिंगस्टोन (६), शशांक सिंग (८), आशुतोष शर्मा (३) सर्वच फलंदाजांनी पंजाबच्या चाहत्यांची पूर्णपणे निराशा केली. हरप्रीत ब्रारने १२ चेंडूत २९ धावा केल्या. त्यामुळेच पंजाबला १४२ धावांपर्यंत मजल मारता आली. गुजरातकडून साई किशोरने ३३ धावांत ४, नूरने २० धावांत २, मोहीत शर्माने ३२ धावांत २, राशिदने १५ धावांत १ बळी टिपले.