Join us  

IPL 2024 सुरू होण्याआधीच 'बवाल'; मोहम्मद शमीला दुसऱ्या टीमकडून ऑफर, गुजरातला खबर लागताच...

गुजरातच्या संघातून हार्दिक पांड्या आधीच मुंबई संघाकडे गेला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 1:20 PM

Open in App

Mohammad Shami Gujarat Titans, IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग सुरू होण्यास आता थोडाच अवधी शिल्लक असून आता सर्वांच्या नजरा १९ डिसेंबरला होणाऱ्या लिलावाकडे लागल्या आहेत. या दरम्यान, एक खुलासा समोर आला आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की एका संघाने थेट एका खेळाडूशी व्यापाराबाबत बोलणी केली होती. ही बाब खरे पाहता IPL च्या नियमांच्या विरोधात आहे. त्यामुळे यावर गुजरातचा संघही भडकल्याचे दिसून आले. गुजरात टायटन्सच्या सीओओने एका मुलाखतीत दावा केला की, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला एका संघाने संपर्क केला होता, परंतु शमी गुजरातच्या संघासोबतच राहिला.

IPL 2024 पूर्वीच गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आणि कर्णधार हार्दिक पांड्या संघ सोडून मुंबई इंडियन्ससोबत गेला. मोहम्मद शमीही संघ सोडणार होता, मात्र तसे होऊ शकले नाही. गुजरात टायटन्सचे सीओओ कर्नल अरविंदर सिंग यांनी माहिती दिली की अनेक संघ मोठ्या खेळाडूंसाठी संपर्क साधतात, परंतु आयपीएलमधील नियम असा आहे की तुम्ही केवळ संघाद्वारे खेळाडूशी संपर्क साधू शकता. मात्र मोहम्मद शमीला थेट संपर्क करण्यात आला, जे नियमांच्या विरोधात आहे. याची खबर लागताच गुजरात संघ व्यवस्थापन चांगलंच संतापलं. टीमचे सीओओ म्हणाले की, आम्हाला याविषयी नंतर कळाले, जे पूर्णपणे चुकीचे आहे. तुम्ही अशा खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफशी थेट संपर्क कसा साधू शकता?

दरम्यान, IPL 2024 साठीचा लिलाव 19 डिसेंबर रोजी होणार आहे, ज्यामध्ये सुमारे 1200 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. लिलावापूर्वी संघांनी कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. यात गुजराकडून हार्दिक पांड्याने मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला. हा करार मुंबई आणि गुजरात संघामध्ये झाला. त्यामुळे त्यावर कोणताही वाद झाला नाही. यानंतर गुजरात टायटन्सने युवा शुभमन गिलची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. गुजरात टायटन्ससाठी संघ म्हणून ही तिसरी आयपीएल असेल. संघाने पहिल्या दोन हंगामात एकदाच विजय मिळवला आहे, तर एका हंगामात उपविजेतेपद पटकावले आहे.

टॅग्स :आयपीएल २०२३मोहम्मद शामीगुजरात टायटन्सहार्दिक पांड्याशुभमन गिल