IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Live Marathi - पंजाब किंग्सचे स्टार फलंदाज अपयशी ठरलेले असताना त्यांनी विजयाच्या आशा सोडल्या होत्या. पण, शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा ( इम्पॅक्ट खेळाडू) या युवकांनी गुजरात टायटन्सच्या पोटात गोळा आणला. या दोघांनी २२ चेंडूंत मॅचविनिंग ४३ धावांची स्फोटक भागीदारी केली. शशांकने अर्धशतक झळकावून विजयात सिंहाचा वाटा उचलला, तर आशुतोषने ३१ धावांची वादळी खेळी केली. आयपीएल २०२४ मधील हा सर्वाधिक मोठा धावांचा यशस्वी पाठलाग ठरला.
कर्णधार शुबमन गिलने गुजरात टायटन्सला धावांचा डोंगर उभारून दिला. केन विलियम्सनने ( २६) चांगला खेळ केला. साई सुदर्शनने १९ चेंडूंत ६ चौकारांसह ३३ धावा चोपून वेग वाढवला. राहुल तेवाटीयाने ८ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद २३ धावा केल्या. गुजरातने ४ बाद १९९ धावा उभ्या केल्या. शुबमन ४८ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारासह ८९ धावांवर नाबाद राहिला. उमेश यादवने दुसऱ्या षटकात शिखर धवनचा ( १) त्रिफळा उडवून PBKSला मोठा धक्का दिला. जॉनी बेअरस्टो व प्रभसिमरन सिंग यांनी चांगले फटके खेचले. नूर अहमदने त्याच्या पहिल्याच चेंडूवर बेअरस्टोचा ( २२) त्रिफळा उडवला.
नूर अहमदने पंजाबला आणखी एक मोठा धक्का देताना प्रभसिरमला ( ३५) माघारी जाण्यास भाग पाडले. अझमतुल्लाह उमरजाईनेही पंजाबच्या सॅम कुरनला ( ५) स्वस्तात बाद केल्याने त्यांची अवस्था ४ बाद ७० अशी केली. आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्याने आता सिकंदर रजा व शशांक सिंग यांच्यावर त्यांची भिस्त होती. गुजरातने इम्पॅक्ट खेळाडू म्हणून अनुभवी मोहित शर्माला गोलंदाजीला आणले आणि त्याने सिकंदरला ( १५) बाद केले. या विकेटनंतर मोहितने पर्पल कॅप नावावर केली. ६ षटकांत ६९ धावा PBKS ला हव्या होत्या आणि शशांक व जितेश शर्मा याच्यावर त्यांच्या आशा होत्या.
जितेशने १६व्या षटकात राशिद खानला दोन खणखणीत षटकार खेचून पंजाबला दीडशेपार नेले. पण, तिसरा सिक्स मारण्याच्या प्रयत्नात जितेश ( १६) झेलबाद झाला. ही गुजरातकडून त्याची पन्नासावी विकेट ठरली आणि हा पल्ला गाठणारा तो पहिला गोलंदाज ठरला. नूरने ४-०-३२-२ अशी स्पेल टाकली. १६ षटकानंतर GT च्या १४१ धावा होत्या, तर PBKS ने १५३ धावा चोपलेल्या. पण, त्यांच्या सहा विकेट पडल्याने दडपण होते .त्यांनी इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आशुतोष शर्माला मैदानावर पाठवले. ३ धावांवर उमेशने त्याचा झेल टाकला. शशांकने २५ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले. आशुतोषने खणखणीत फटके खेचून १२ चेंडू २५ धावा असा सामना नजीक आणला. मोहित शर्माच्या १९व्या षटकात पंजाबच्या फलंदाजांनी १८ धावा कुटल्या आणि आता ६ चेंडूंत ७ धावाच त्यांना करायच्या होत्या.
गिलने शेवटचे षटक दर्शन नळकांडेला टाकायला सांगितले आणि पहिल्याच चेंडूवर त्याने २२ चेंडूंवरील ४३ धावांची भागीदारी तोडली. आशुतोष १७ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३१ धावांवर बाद झाला. पण, पुढील चेंडू दर्शनने बाऊन्सरच्या प्रयत्नात वाईड टाकला. ३ चेंडूंत ५ धावा हव्या असताना शशांक स्ट्राईकवर आला. शशांकने चौकार खेचला आणि २ चेंडूत १ धावा असा सामना आणला. पंजाबला हा चौकार नशीबाने मिळाला. शशांकने २९ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारासह नाबाद ६१ धावा करून संघाला ३ विकेट्सने विजय मिळवून दिला.