IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सतराव्या सामन्यात पंजाब किंग्जने कमाल करत विजय संपादन केला. युवा खेळाडू शशांक सिंगच्या स्फोटक खेळीच्या जोरावर पंजाबने गुजरातच्या तोंडचा घास पळवला. आयपीएल लिलावात पंजाबच्या फ्रँचायझीने ज्याला खरेदी करण्यासाठी टाळाटाळ केली त्याच शशांकने गुरुवारी स्फोटक खेळी केली. GT vs PBKS लढतीत धावांचा पाऊस पाहायला मिळाला. यजमान गुजरातने १९९ धावांचा डोंगर उभा केला होता आणि पंजाबचे स्टार फलंदाज अपयशी ठरले होते. त्यामुळे गुजरात सहज जिंकेल असे वाटले होते, परंतु शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा (इम्पॅक्ट खेळाडू) या युवा शिलेदारांनी GT च्या तोंडचा घास पळवला.
शशांकने केलेल्या अप्रतिम खेळीनंतर पंजाबची संघ मालक प्रीती झिंटाने त्याच्यासाठी एक भावनिक पोस्ट केली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, आयपीएल लिलावात शशांक सिंगबद्दल भूतकाळात घडलेल्या गोष्टींबद्दल भाष्य करण्यासाठी आजचा दिवस योग्य वाटतो. अशा परिस्थितीत आत्मविश्वास कमी होणे हे साहिजकच आहे. अनेकजण दबावाखाली गेले असते, डि-मोटिव्हेट झाले असते... पण शशांक याला अपवाद ठरला. तो इतरांसारखा खचणारा नाही. तो खरोखर खास आहे. कारण तो केवळ एक खेळाडू म्हणून त्याच्या कौशल्यामुळे नाही तर त्याच्या सकारात्मक वृत्तीमुळे देखील खूप खास आहे.
तसेच त्याने सर्व टिप्पण्या आणि विनोद खेळीमेळीने घेतले. त्याने स्वतःची पाठराखण केली आणि तो कोणत्या परिस्थितीतून आला आहे हे दाखवून दिले, त्यासाठी मी त्याचे कौतुक करते. मला आशा आहे की जेव्हा आयुष्य एक वेगळे वळण घेते... सर्वकाही मनासारखे होत नाही तेव्हा तुमच्या सर्वांसाठी शशांक एक उदाहरण असेल. कारण लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मला वाटते की, शशांक सारखा स्वतःवर विश्वास ठेवा आणि मला खात्री आहे की तो जीवनाच्या प्रत्येक खेळीत सामनावीर होईल, असेही प्रीती झिंटाने म्हटले.
दरम्यान, गुजरात टायटन्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने ऐतिहासिक विजय मिळवला. शशांकने २९ चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६१ धावा करून संघाला ३ विकेट्सने विजय मिळवून दिला. आयपीएल इतिहासात सर्वाधिकवेळा २०० किंवा त्याहून अधिक धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा मान पंजाब किंग्सने (६) पटकावला. त्यांनी मुंबई इंडियन्सचा (५) विक्रम मोडला.