यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. आरसीबीला आतापर्यंत खेळलेल्या ८ पैकी ७ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीमधून आरसीबीचा संघ जवळपास बाद झाला आहे. यंदाच्या हंगामातील निराशाजनक कामगिरीनंतर आरसीबीवर चौफेर टीका होत आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात सुमार संघ म्हणून आरसीबीची हेटाळणी केली जात आहे. मात्र इतिहास आणि आकडेवारी पाहिल्यास आरसीबी नाही तर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे आयपीएलमधील सर्वाधिक अपयशी संघ असल्याचे दिसून येते.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळवलेलं नाही. त्या आधारावर आरसीबी हा या स्पर्धेतील सर्वात दुबळा संघ असल्याचा तर्क दिला जात आहे. मात्र आरसीबीप्रमाणेच दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स हे संघही आयपीएलचं विजेतेपद पटकावू शकलेले नाहीत. या तिन्ही संघानी पहिल्या हंगामापासून आपर्यंत दरवर्षी आयपीएलमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे आयपीएलचं विजेतेपद हाच यशाचा निकष लावला तर हे तीनही संघ आयपीएलमधील अपयशी संघ ठरतील.
मात्र आरसीबी, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांची तुलना केल्यास त्यामध्ये आरसीबीचा संघ काहीसा सरस ठरतो. आरसीबीने २००९, २०११ आणि २०१६ अशा तीन वेळा आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. तर पंजाब किंग्स (२०१४) आणि दिल्ली कॅपिटल्स (२०२०) यांनी प्रत्येकी एकवेळा आयपीएलचा अंतिम फेरी गाठली आहे. याशिवाय आरसीबीने ४ वेळा प्लेऑफ फेरी गाठली आहे. दिल्लीने ५ वेळा तर पंजाब किंग्सने एकदा प्लेऑफ फेरी खेळली आहे. त्यामुळे आरसीबीपेक्षा दिल्ली आणि पंजाबच्या संघांची कामगिरी सुमार झाल्याचे दिसून येतं.
त्याबरोबरच आयपीएलमधील गुणतालिकेतील स्थानाचा आधार घ्यायचा झाल्यास दिल्ली कॅपिटल्सचा रेकॉर्ड खराब आहे. दिल्लीचा संघ चारवेळा पॉईंट्स टेबलमध्ये तळाला राहिला आहे. तर पंजाबचा संघ तीन वेळा तळाला राहिलाय. बंगळुरूचा संघ हा दोन वेळा पॉईंट्स टेबलमध्ये तळाला राहिला आहे. त्यामुळे याबाबतीतही बंगळुरूचा संघ काहीसा सरस आहे.