IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या पर्वासाठी लखनौ सुपर जायंट्सने तयारी सुरू केली आहे. त्यांनी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला होता आणि आज त्यांनी अँडी फ्लॉवर ( Andy Flower) यांना निरोपाचा मॅसेज पोस्ट केला. त्यामुळे पुढील पर्वात LSG नवा प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली खेळणार हे निश्चित झाले आहे. फ्रँचायझीनेही एका वेगळ्या शैलीत नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली आणि त्यामुळे चाहते बुचकळ्यात पडले आहेत. संजीव गोएंका यांच्या फ्रँचायझीला मुख्य प्रशिक्षकाची गरज होती, कारण सध्याचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्यासोबतचा दोन वर्षांचा करार IPL 2023 नंतर संपला. फ्लॉवर यांच्या मार्गदर्शनाखील LSG आयपीएल २०२२ मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरले होते आणि आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटरमध्ये त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. आता त्यांचे पुढील लक्ष्य जेतेपद असणार आहे आणि त्यासाठी त्यांनी नवा प्रशिक्षक निवडला आहे.
फ्रँचायझीने आज अमेरिकन सिंगर जस्टीन टीमरलेक याच्या फोटोसोबत लंगरचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्यांची अनोखी घोषणा सर्वांना बुचकळ्यात पाडणारी ठरतेय.
जस्टीन लँगर LSG चा नवा प्रशिक्षक सँडपेपर घोटाळ्यानंतर जस्टिन लँगरने ऑस्ट्रेलियन संघाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी उत्कृष्ट काम केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने स्टार खेळाडूंशिवायही चमत्कार करून दाखवले. त्यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ जिंकला. त्यांच्या प्रशिक्षणाखाली पर्थ स्कॉचर्सने त्यांच्या पहिल्या चार वर्षांत तीन बिग बॅश लीग विजेतेपदे जिंकली.
आता लखनौ फ्रँचायझीसोबत ते काम करणार आहे आणि मॉर्नी मॉर्केल, जॉन्टी रोड्स आणि विजय दहिया यांच्यासह LSGच्या कोचिंग स्टाफचा भाग होईल. लँगरने ऑस्ट्रेलियाकडून १०८ कसोटीत ४५.२७च्या सरासरीने ७६९६ धावा केल्या आहेत आणि त्यात २३ शतकं व ३० अर्धशतकांचा समावेश आहे.