कोलकाता: दोनवेळेचा चॅम्पियन कोलकाता संघ ईडन गार्डनवर आयपीएल-१७ मध्ये रविवारी लखनौवर विजय नोंदविण्याच्या इराद्याने खेळणार आहे. ईडनवर यजमानांचा हा पहिला सामना असून, यंदा प्ले ऑफ गाठण्यासाठी हा विजय महत्त्वाचा ठरू शकतो, याची जाणीव मेंटॉर गौतम गंभीरला आहेच. दोन्ही संघांनी यंदा प्रत्येकी तीन-तीन विजय नोंदविले आहेत. केकेआर आणि लखनौ यांच्यातील सामन्याला दुपारी ३.३० वाजल्यापासून सुरुवात होईल.
कोलकाता संघ- आंद्रे रसेल, सुनील नारायण यांच्यावर संघ फार विसंबून असतो. बोटाच्या दुखापतीमुळे नितीश राणा बाहेर आहे. कर्णधार श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यरकडून मोठी खेळी अपेक्षित असेल.- रमनदीपसिंग, अंगक्रिश रघुवंशी यांच्याकडूनही कामगिरीची अपेक्षा असेल. मिचेल स्टार्क गोलंदाजीत अपयशी ठरला. त्याने २ सामन्यांत १०० धावा मोजल्या.
लखनौ संघ- मयंक यादवची उणीव जाणवेल. क्विंटन डिकॉक, कर्णधार लोकेश राहुल यांच्याकडून मोठी खेळी होण्याचे आशा आहे. मार्कस् स्टोयनिस आणि निकोलस पूरन लौकिकानुसार खेळी करण्यात अपयशी ठरले. - आयुष बदोनी, अर्शद खान या युवा खेळाडूंवर भिस्त असेल. गोलंदाजीत रवी बिश्नोई आणि कृणाल पंड्या हे फिरकीच्या बळावर सामना फिरवू शकतात.