Virat Kohli Wicket Controversy, Cricket Rule Explained, IPL 2024 KKR vs RCB: अटीतटीच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एका धावेने पराभव केला. KKR ने दिलेले २२३ धावांचे पार करताना RCBचा १ धावेने पराभव झाला. या आव्हानाचा पाठलाग करताना सामन्यात विराट कोहलीच्या विकेटवरून बराच वाद झाल्याचे दिसून आले. त्याला बाद ठरवणे योग्य की अयोग्य अशी चर्चा कॉमेंट्री बॉक्स पासून ते सोशल मीडियापर्यंत सुरु झाली. अखेर क्रिकेटच्या अद्ययावत नियमानुसार तो बादच असल्याचे निश्चित करण्यात आले.
असा बाद झाला विराट कोहली, पाहा व्हिडीओ-
विराट कोहली चांगल्या फॉर्मात होता. त्याने मिचेल स्टार्कसारख्या गोलंदाजाला उत्तुंग असा षटकार लगावला होता. पण हर्षित राणाच्या एका फुल टॉस चेंडूवर तो बाद झाला. त्याला मैदानावरील पंचांनी बाद ठरवले. त्यानंतर तिसऱ्या पंचांनीही त्याला बादच ठरवले. त्याच्या विकेट वरून मैदानात आणि मैदानाबाहेर बराच वाद पाहायला मिळाला. विराट पंचांशी वाद घालून मैदानाबाहेर गेला.
----
नियम काय सांगतो?
उंचीचा नो बॉल हा फलंदाजाची उंची आणि बॅटिंग क्रिज या दोन गोष्टींशी संबंधित असतो. यंदा आयपीएल मध्ये प्रत्येक खेळाडूची सरळ उभे राहिलेले असतानाची उंची मोजण्यात आली आहे. त्यानुसार उंचीचा नो-बॉल आहे की नाही हे पाहिले जाते. विराट कोहलीला टाकलेला चेंडू फुलटॉस होता आणि विराट कोहली त्यावेळी क्रिजपासून बराच पुढे होता आणि आपल्या पायाच्या बोटांवर होता. चेंडू फुलटॉस असल्यामुळे खालच्या दिशेने जात होता. विराट कोहली जर क्रीज मध्ये उभा असता तर तो चेंडू त्याच्या कमरेच्या उंचीपेक्षा खाली आला असता असा अंदाज बॉल प्रोजेक्शन मध्ये दाखवण्यात आला. याचाच अर्थ विराट क्रिजच्या पुढे गेला नसता तर हा चेंडू त्याला कमरेखाली खेळता आला असता. आयपीएल मध्ये खेळणाऱ्या खेळाडूची उंची मोजून तसेच बॉल प्रोजेक्शन चा विचार करूनच एखादा चेंडू नो-बॉल आहे की नाही हे ठरवले जाते. त्यामुळे विराटला बाद ठरवणं योग्यच होतं असा निष्कर्ष काढला जात आहे. प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यानेदेखील हाच नियम आपल्या व्हिडिओतून समजावून सांगितला आहे.
दरम्यान, विराट कोहलीने सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करायचा ठरवला होता. त्यामुळे त्याने पहिल्या ६ चेंडूत १ चौकार आणि २ षटकार खेचले होते. पण तो विचित्र पद्धतीने बाद झाला. त्यामुळे त्याला ७ चेंडूत १८ धावा काढून तंबूत परतावे लागले.