IPL 2024 Schedule : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चे दोन सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील १७ एप्रिलला ईडन गार्डन्सवर होणारा सामना आता एक दिवस अगोदर म्हणजेच १६ एप्रिलला खेळवला जाईल. त्यामुळे १६ एप्रिलला नरेंदद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना आता १७ एप्रिलला खेळवला जाईल.
१७ एप्रिलला रामनवमी उत्सव असल्याने कोलकाता येथे होणाऱ्या लढतीसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवणे शक्य होणार नसल्याने हा सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाणार आहे. लोकसभेच्या निवडणुकाही जवळ येत आहेत आणि वेळापत्रकानुसार गोष्टी अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे. BCCI हा सामना पुढे ढकलण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आधीच दिले होते. फ्रँचायझी, ब्रॉडकास्टर्स आणि राज्य संघटनांना याबाबतचे संकेत दिले होते. BCCI आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) यांनी कोलकाता पोलिसांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
BCCI ने IPL 2024 चे वेळापत्रक दोन टप्प्यात जाहीर केले. त्यात पहिल्या दोन आठवड्यांच्या २१ सामन्यांचे वेळापत्रक आधी जाहीर केले गेले होते. उर्वरित वेळापत्रक निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर जाहीर केले गेले. IPL 2024 मध्ये आतापर्यंत KKR आणि RR हे दोनच अपराजित संघ आहेत. KKR ने सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला, तर RR ने मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सवर विजय नोंदवला.