कोलकाता : यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेले कोलकाता आणि राजस्थान संघ मंगळवारी एकमेकांविरुद्ध भिडतील. यावेळी राजस्थानला नमवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकाविण्याच्या निर्धाराने कोलकाताचा संघ घरच्या मैदानावर उतरेल. यावेळी राजस्थानपुढे कोलकाताच्या सुनील नरेनच्या फिरकीविरुद्ध दमदार खेळ करावा लागेल. २०१२ पासून कोलकाता संघात प्रवेश केल्यानंतर नरेनने ईडन गार्डन्सवर खेळताना प्रतिस्पर्धी संघांची मोठी 'फिरकी' घेतली आहे.
कोलकाता संघ -- मेंटॉर म्हणून गौतम गंभीरचे कोलकाता संघात पुनरागमन झाल्यानंतर नरेनने पुन्हा एकदा शानदार अष्टपैलू खेळ केला आहे. कोलकाताने बाजी मारल्यास गुणतालिकेत ते अव्वल स्थान गाठतील.- लखनौविरुद्ध झंझावाती अर्धशतक फटकावलेल्या फिल सॉल्टकडून पुन्हा एकदा धडाकेबाज फटके- बाजीची अपेक्षा. अय्यरला आपल्या क्षमतेनुसार खेळावे लागेल.
राजस्थान संघ -- जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांच्याकडून आक्रमक सुरुवातीची अपेक्षा. जैस्वालला चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊन मोठी खेळी करावी लागेल,- संजू सॅमसन, रियान पराग आणि शिमरोन हेटमायर यांना नरेनविरुद्ध दमदार खेळ करावा लागेल.- ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल आणि केशव महाराज यांच्यामुळे राजस्थानची गोलंदाजी मजबूत.