IPL 2024, KKR vs SRH Final Marathi Live : कोलकाता नाईट रायडर्सने १० वर्षानंतर इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावले. इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या मनात धडकी भरवणारे सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज आज अपयशी ठरले. आतापर्यंत ही स्पर्धा फलंदाजांची वाटत होती, परंतु फायनलमध्ये चित्र परस्पर विरोधी दिसले. हैदराबादला ११३ धावांवर ऑल आऊट करून कोलकाताना १०.३ षटकांत २ बाद ११४ धावा करून ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या पराभवानंतर SRH ची मालकिण काव्या मारन ( Kaviya Maran) पुन्हा चर्चेत आली. २०१६ नंतर यंदाचे जेतेपद आपलेच असे तिला वाटले होते, परंतु फायनलमध्ये चित्र बदलले. तिला अश्रू अनावर झाले. थोडसं रडून तिने स्वतःला सावरले आणि आपल्या खेळाडूंना चिअर करण्यासाठी उभी राहिली.
२०१२ व २०१४ मध्ये त्यांनी गौतम गंभीरच्या ( Gautam Gambhir) नेतृत्वाखाली आयपीएल चषक उंचावला होता आणि आता गौतम गंभीर हा त्यांचा मेंटॉर आहे. कर्णधार व मेंटॉर म्हणून आयपीएल ट्रॉफी जिंकणारा गंभीर हा पहिलाच खेळाडू आहे. IPL 2024 Final मध्ये KKR ने उत्तम गोलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादचा सहज पराभव केला. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर वेंकटेश अय्यरने एकहाती सामना जिंकून दिला.
SRH ने फायनलमध्ये पूर्णपणे लोटांगण घातले. कर्णधार पॅट कमिन्स ( २४) हा SRH साठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मिचेल स्टार्क ( २-१४), हर्षित राणा ( २-२४) व आंद्रे रसेल ( ३-१९) यांच्या माऱ्यासमोर SRH चा पूर्ण संघ १८.३ षटकांत ११३ धावांत तंबूत परतला. प्रत्युत्तरात, पॅट कमिन्सने दुसऱ्याच षटकात सुनील नरीनला ( ६) झेलबाद करून माघारी पाठवले. मात्र, वेंकटेश अय्यर आणि रहमनुल्लाह गुरबाज यांनी ४५ चेंडूंत ९१ धावा जोडून विजय निश्चित केला. शाहबाज अहमदच्या गोलंदाजीवर गुरबाज ( ३९) बाद झाला. वेंकटेश २६ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांसह ५२धावांवर नाबाद राहिला आणि कोलकातान १०.३ षटकांत २ बाद ११४ धावा करून सामना जिंकला.
Web Title: IPL 2024, KKR vs SRH Final Marathi Live : Kavya maran is crying & she appreciates the Champions, KKR, Video viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.