आयपीएल २०२४ मधील साखळी फेरीचे सामने संपले असून, प्लेऑफमध्ये खेळणाऱ्या संघांची नावंही निश्चित झाली आहेत. आता मंगळवारी होणाऱ्या क्वालिफायर १ मध्ये गुणतक्त्यात पहिल्या दोन क्रमांकावर असलेले कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमने सामने येणार आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादने आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर विरोधी संघांना हादरवून टाकले आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या लढतीत सनरायझर्सचा सामना करताना कोलकाता नाईटरायडर्सच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. मात्र कोलकाता नाईटरायडर्सचा संघही यंदाच्या हंगामात धडाकेबाज कामगिरी करताना दिसत आहे. पण प्लेऑफमधील सनरायझर्स हैदराबादचे आकडे हे कोलकाता नाईटरायडर्सची चिंता वाढवणारे आहेत.
सनरायझर्स हैदराबादने प्लेऑफमधील तिसरा संघ म्हणून क्वालिफाय केलं होतं, त्यानंतर पंजाबला पराभूत करत त्यांनी गुणतक्त्यात दुसरं स्थान पटकावलं. २०२० नंतर हैदराबादने पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. दुसरीकडे केकेआरची प्लेऑफमधील कामगिरी जबरदस्त झालेली आहे. केकेआरने आठव्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. २०२० मध्येही कोलकात्याचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला होता. मात्र त्यावेळी क्वालिफायर-२ मध्ये त्यांना दिल्ली कॅपिटल्सकडून पराभूत व्हावे लागले होते.
हैदराबाद आणि कोलकात्याचे संघ प्लेऑफमध्ये एकूण ३ वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये हैदराबादचं पारडं जड दिसत आहे. प्लेऑफमध्ये हैदराबादने दोन वेळा तर कोलकात्याने एकदा विजय मिळवला आहे. यादरम्यान, दोन्ही संघ दोन वेळा एलिमिनेटर तर एकदा क्वालिफायर-२ मध्ये आमने सामने आले होते. हैदराबादने २०१६ मध्ये एलिमिनेटर लढतीत कोलकात्याचा २२ धावांनी पराभव केला होता. त्यानंतर २०१७ मध्ये पुन्हा एकदा दोन्ही संघ एलिमनेटरमध्ये लढले होते. त्यावेळी कोलकाताने डकवर्थ-लुईस नियमानुसार ७ विकेट्सनी विजय मिळवला होता. तर २०१८ च्या क्वालिफायर-२ मध्ये हैदराबादने कोलकाता नाईटरायडर्सचा १४ धावांनी पराभव केला होता.
हैदराबादने प्लेऑफमध्ये ११ सामने खेळले आहेत. त्यातील ५ लढतींमध्ये त्यांचा विजय झाला आहे. तर ६ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता कोलकात्याचा संघ हा इतिहास विसरून कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, क्वालिफायर १ मध्ये पराभूत होणाऱ्या संघाला क्वालिफायर २ मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. मात्र पहिल्याच प्रयत्नात विजय मिळवून फायनलचं तिकीट पक्कं करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.