IPL 2024 KKR vs SRH, Qualifier 1 Live Marathi : गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या फायनलमध्ये प्रवेश केला. २०१४ नंतर पुन्हा एकदा त्यांना जेतेपद पटकावण्याची संधी मिळाली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या क्वालिफायर १ सामन्यात KKR ने सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवला. २०२१ नंतर KKR फायनल खेळणार आहेत. हैदराबादला आता RR vs RCB यांच्यातल्या विजेत्या संघाविरुद्ध क्वालिफायर २ मध्ये खेळून फायनलमध्ये धडक देण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
आयपीएल २०२४ मध्ये गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेले SRH ची फलंदाजी आज KKR समोर अपयशी ठरली. मिचेल स्टार्कने पहिल्या स्पेलमध्ये ३ विकेट्स घेऊन हैदराबादला बॅकफूटवर फेकले. ट्रॅव्हिस हेड सलग दुसऱ्या सामन्यात भोपळ्यावर परतला. ४ बाद ३९ अशा अवस्थेतून राहुल त्रिपाठी आणि हेनरिच क्लासेन यांनी ३७ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी करून संघाला सुस्थितीत आणले होते. क्लासेन २१ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३२ धावांवर बाद झाला. त्यात १३व्या षटकात त्रिपाठी ३५ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५५ धावांवर रन आऊट झाला. त्यानंतर हैदराबादचा डाव पुन्हा गडगडला. कर्णधार पॅट कमिन्सने ३० धावांचे योगदान दिल्याने संघाला १९.३ षटकांत सर्वबाद १५९ धावांपर्यंत पोहोचता आले. स्टार्क ( ३-३४) याला वरुण चक्रवर्थी ( २-२६) याच्यासह वैभव अरोरा, हर्षित राणा, सुनील नरीन व आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेऊन साथ दिली.
श्रेयस अय्यर व वेंकटेश अय्यर यांनी KKR चा डाव सावरला. वेंकटेशने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ श्रेयसने ३ खणखणीत षटकार खेचून २३ चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले आणि १३.४ षटकांत संघाचा विजयही पक्का केला. कोलकातनने २ बाद १६४ धावा करून बाजी मारली. श्रेयस २४ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला, तर वेंकटेशनेही २८ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५१ धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४४ चेंडूंत ९७ धावा झोडल्या.