IPL 2024 KKR vs SRH, Qualifier 1 Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये कालपर्यंत मिचेल स्टार्कची ( MITCHELL STARC ) कामगिरी निराशाजनक झाली होती. १२ सामन्यांत त्याला १२ विकेट्सच घेता आल्या होत्या आणि त्याची इकॉनॉमी ११.३६ एवढी खराब होती. पण, ऑस्ट्रेलियाच्या या अनुभवी गोलंदाजाने आज त्याचा करिष्मा दाखवला. पहिल्याच षटकात ट्रॅव्हिड हेडचा त्रिफळा उडवल्यानंतर पाचव्या षटकात सलग दोन विकेट्स घेऊन हैदराबादची अवस्था ४ बाद ३९ अशी त्याने केली.
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video
SRH चा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून KKR समोर तगडे लक्ष्य ठेवण्याचा निर्णय घेतला. पण, ज्यांच्या जीवावर कमिन्सने हे धाडस दाखवले, त्यांनी तोंडावर पाडले. पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्मा नॉन स्ट्रायकर एंडला रन आऊट होण्यापासून वाचला. श्रेयस अय्यरचा डायरेक्ट हीट KKR विकेट मिळवून देणारा ठरला असता. पण, मिचेल स्टार्कने दुसऱ्याच चेंडूवर SRH चा ओपनर ट्रॅव्हिस हेड याचा त्रिफळा उडवला. सलग दुसऱ्या सामन्यात हेड भोपळ्यावर बाद झाला. प्ले ऑफमध्ये भोपळ्यावर बाद होणारा तो SRH चा चौथा सलामीवीर ठरला. राहुल त्रिपाठीने सलग दोन चौकार खेचून दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु दुसऱ्या षटकात वैभव अरोराने SRH ला पहिला धक्का दिला. अभिषेक शर्माने ( ३) कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू आंद्रे रसेलने हवेत झेपावत सुरेख टिपला आणि SRH चे दोन्ही सलामीवीर १३ धावांवर माघारी परतले.
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला आयपीएल २०२४च्या मिनी लिलावात सर्वाधिक भाव मिळाला होता. २ कोटी मूळ किंमत असलेल्या या ३३ वर्षांच्या खेळाडूला कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल २४.७५ कोटी रुपये खर्चून स्वत:च्या संघात घेतले. त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि गोलंदाजीचा जोडीदार पॅट कमिन्स याला मागे टाकले होते. स्टार्क हा २००८ पासून सुरू झालेल्या आयपीएल इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू बनला.