IPL 2024 KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्सनेसनरायझर्स हैदराबादला नमवून विजयी सलामी दिली. आंद्रे रसेलच्या स्फोटक खेळीच्या जोरावर केकेआरने हैदराबादला २०९ धावांचे तगडे लक्ष्य दिले होते. (IPL 2024 News) धावांचा बचाव करताना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात केकेआरने बाजी मारली. सामना केकेआरच्या बाजूने झुकला असताना हेनरिक क्लासेनने (Henric Classen) स्फोटक खेळी करून रंगत आणली. त्याने २९ चेंडूत ८ षटकारांच्या मदतीने ६३ धावांची स्फोटक खेळी केली. धावांचा बचाव करताना केकेआरकडून हर्षित राणा हिरो ठरला. त्याने सर्वाधिक ३ बळी घेत आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
दरम्यान, हर्षित राणाने अप्रतिम गोलंदाजी केली पण त्याच्या सेलिब्रेशनमुळे त्याला मोठी किंमत मोजावी लागली. हैदराबादविरूद्धच्या सामन्यात खेळाडूंना खुन्नस आणि विचित्र हातवारे केल्याप्रकरणी राणा दोषी आढळला. मयंक अग्रवालला बाद केल्यानंतर आणि हेनरिक क्लासेनला बाद केल्यानंतर हर्षित राणाने भन्नाट सेलिब्रेशन केले. त्यामुळे त्याला मॅच फीच्या ६० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. अग्रवालसोबतच्या कृत्याप्रकरणी १० टक्के आणि क्लासेनसोबतच्या संघर्षामुळे ५० टक्के कपात करण्यात आली.
अखेरच्या चेंडूपर्यंत थरार हेनरिक क्लासेनने १९ व्या षटकात ३ षटकार ठोकून हैदराबादच्या चाहत्यांना जागे केले. खरं तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरलेल्या मिचेल स्टार्कची चांगलीच धुलाई झाली. स्टार्कच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर शाहबाज अहमदने देखील षटकार ठोकला अन् केकेआरच्या ताफ्यात खळबळ माजली. हैदराबादला विजयासाठी शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. हर्षित राणाच्या पहिल्याच चेंडूवर क्लासेनने षटकार लगावला. मग ५ चेंडूत ७ धावांची गरज होती. दुसऱ्या चेंडूवर एक धाव काढली. तिसऱ्या चेंडूवर शाहबाज अहमद बाद झाला. चौथ्या चेंडूवर एक धाव काढल्याने क्लासेनला स्ट्राईक मिळाली. पाचव्या चेंडूवर सुयश शर्माने अप्रतिम झेल घेऊन क्लासेनला बाहेरचा रस्ता दाखवला. अखेरच्या चेंडूवर हैदराबादला ५ धावांची गरज होती. पण शेवटचा चेंडू निर्धाव गेला अन् केकेआरने ४ धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना केकेआरकडून सुरुवातीला फिल साल्ट (५४) आणि रमनदीप सिंग यांनी शानदार खेळी केली. त्यानंतर आंद्रे रसेलच्या वादळाने हैदराबादच्या गोलंदाजांना धू धू धुतले. केकेआरकडून फिल साल्टने (५४) धावा केल्या, तर सुनील नरेन (२), व्यंकटेश अय्यर (७), श्रेयस अय्यर (०), नितीश राणा (९), रमनदीप सिंग (३५), रिंकू सिंग (२३) आणि आंद्रे रसेलने नाबाद ६४ धावा केल्या. केकेआरने निर्धारित २० षटकांत ७ बाद २०८ धावा केल्या होत्या. रसेलने ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २५ चेंडूत ६४ धावा कुटल्या. त्याने केवळ २० चेंडूत सहा षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या वादळी खेळीसमोर हैदराबादच्या कोणत्याच गोलंदाजाचा टिकाव लागला नाही. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक धावा दिल्या. त्याला एकही बळी घेता आला नाही. भुवीने त्याच्या निर्धारित ४ षटकांत ५१ धावा दिल्या, तर मार्को जान्सेन (४०), पॅट कमिन्स (३२), मयंक मार्कंडेय (३९) आणि नटराजनने (३२) धावा दिल्या.