Kavya Maran Reaction Video: शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात सामना झाला. केकेआरने निसटचा विजय मिळवून २ गुण मिळवले. हैदराबादच्या तोंडचा घास पळवल्यानंतर संघाची मालकीण काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल होत आहे. अवघ्या ४ चेंडूत सामन्याचा निकाल बदलला. हेनरिक क्लासेनने स्फोटक खेळी करून सामना हैदराबादच्या बाजूने फिरवला होता. पण, अखेरच्या षटकात हर्षित राणाने अप्रतिम गोलंदाजी करून केकेआरला ४ धावांनी विजय मिळवून दिला.
काव्या मारनची रिॲक्शन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर ती आनंदात दिसते आणि पाचव्या चेंडूवर क्लासेन बाद होताच ती निराश होते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतून काव्याची प्रतिक्रिया दिसून येते. काव्या मारन हैदराबादच्या प्रत्येक सामन्यावेळी प्रेक्षक गॅलरीत उपस्थित असते.
शेवटचे षटक गाजले
हेनरिक क्लासेनने १९ व्या षटकात ३ षटकार ठोकून हैदराबादच्या चाहत्यांना जागे केले. खरं तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरलेल्या मिचेल स्टार्कची चांगलीच धुलाई झाली. स्टार्कच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर शाहबाज अहमदने देखील षटकार ठोकला अन् केकेआरच्या ताफ्यात खळबळ माजली. हैदराबादला विजयासाठी शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. हर्षित राणाच्या पहिल्याच चेंडूवर क्लासेनने षटकार लगावला. मग ५ चेंडूत ७ धावांची गरज होती. दुसऱ्या चेंडूवर एक धाव काढली. तिसऱ्या चेंडूवर शाहबाज अहमद बाद झाला. चौथ्या चेंडूवर एक धाव काढल्याने क्लासेनला स्ट्राईक मिळाली. पाचव्या चेंडूवर सुयश शर्माने अप्रतिम झेल घेऊन क्लासेनला बाहेरचा रस्ता दाखवला. अखेरच्या चेंडूवर हैदराबादला ५ धावांची गरज होती. पण शेवटचा चेंडू निर्धाव गेला अन् केकेआरने ४ धावांनी विजय मिळवला.
दरम्यान, आंद्रे रसेलच्या स्फोटक खेळीच्या जोरावर केकेआरने हैदराबादला २०९ धावांचे तगडे लक्ष्य दिले होते. (IPL 2024 News) धावांचा बचाव करताना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात केकेआरने बाजी मारली. सामना केकेआरच्या बाजूने झुकला असताना हेनरिक क्लासेनने (Henric Classen) स्फोटक खेळी करून रंगत आणली. त्याने २९ चेंडूत ८ षटकारांच्या मदतीने ६३ धावांची स्फोटक खेळी केली. धावांचा बचाव करताना केकेआरकडून हर्षित राणा हिरो ठरला. त्याने सर्वाधिक ३ बळी घेत आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.