जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएलचा सतरावा हंगाम २२ मार्चपासून सुरू होत आहे. आगामी हंगामासाठी अवघे काही दिवस उरले असून सर्वच संघ तयारीला लागले आहेत. चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. आता जवळपास प्रत्येक फ्रँचायझींचे कॅम्प्स लावण्यात आले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचे शिलेदार जमायला सुरूवात झाली आहे.
केकेआरच्या फ्रँचायझीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. आयपीएलच्या सर्व फ्रँचायझींनी आगामी आयपीएल हंगामासाठी सराव सुरू केला आहे. अशा परिस्थितीत केकेआरने प्रशिक्षण सत्राचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये सिक्सर किंग रिंकू सिंग मोठा फटका मारतो, जो चेंडू दुसरीकडे असलेल्या लहान मुलाकडे जातो. या मुलाकडे आणि त्याच्या जर्सीकडे पाहून असे दिसते की तो देखील क्रिकेटचा सराव करत असावा.
रिंकूच्या कृतीनं जिंकलं मन रिंकूने मारलेला फटका दूर गेला पण चेंडू एका लहानग्याला लागला. रिंकूला हे समजताच त्याने या मुलाची भेट घेत विचारपूस केली. यानंतर रिंकू स्वतः त्या मुलाला सॉरी म्हणाला. एवढेच नाही तर उत्तर प्रदेशातील रिंकूने संबंधित मुलाला आणखी काय हवे याची देखील विचारपूस केली. तेव्हा मुलाने रिंकूचा ऑटोग्राफ मागितला. अशा परिस्थितीत रिंकू सिंग आणि अभिषेक नायर मुलाला ऑटोग्राफ देतात. नायरने त्याची टोपीही मुलाला भेट दिली.
आयपीएलमधील एका षटकाराने रिंकूला हिरो बनवले. गुजरातविरूद्धच्या सामन्यातील यश दयालच्या एकाच षटकात रिंकूने ५ षटकार ठोकून प्रसिद्धी मिळवली. रिंकू सिंगने २०१८ मध्येच आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पण त्याला खेळण्याची खरी संधी गेल्या वर्षी मिळाली आणि या संधीचे त्याने सोने केले. रिंकूने आयपीएलच्या मागील हंगामात एकूण १४ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने १४९ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ४७४ धावा केल्या. रिंकूने आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत ३१ सामन्यांत ७२५ धावा केल्या आहेत. आयपीएलच्या आगामी हंगामातील पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
IPL चे वेळापत्रक
- २२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
- २३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
- २३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
- २४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
- २४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
- २५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
- २६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
- २७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
- २८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
- २९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
- ३० मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
- ३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
- ३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
- १ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
- २ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
- ३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
- ४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
- ५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
- ७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
- ७ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ