IPL 2024, Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Live Marathi : सुनील नरीनने ( Sunil Narine) पुन्हा एकदा मैदान गाजवले. त्याच्या ८१ धावांच्या वादळी खेळीने कोलकाता नाईट रायडर्सने धावांचा डोंगर उभा करताना लखनौ सुपर जायंट्ससमोर मोठे लक्ष्य ठेवले. अंगक्रिश रघुवंशी आणि फिल सॉल्ट यांनीही आघाडीच्या फळीत चांगली खेळ केला. आंद्रे रसेलला आज मिळालेल्या बढतीचा फायदा उचलता नाही आला, तर रिंकू सिंग व श्रेयस अय्यर यांनी KKR ला दोनशेपार पोहोचवले.
कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ प्ले ऑफच्या शर्यतीत आहे, फक्त आज जिंकणारा संघ त्या दिशेने कूच करेल. KKR चे १४ गुण आहेत, तर LSG १२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून KKR ला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सुनील नरीन आणि फिल सॉल्ट यांनी पहिल्या विकेटसाठी ४.२ षटकांत ६१ धावा चढवल्या. नवीन उल हकने ही जोडी तोडली आणि फिल सॉल्ट १४ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह ३२ धावांवर बाद झाला. पण, नरीन तुफान फॉर्मात दिसला आणि त्याने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. KKR ने १० षटकांत १ बाद ११० धावा उभ्या केल्या. ११व्या षटकात नरीनने मार्कस स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर तीन खणखणीत षटकार खेचले.
७२ धावांवर नरीनचा सीमारेषेवर देवदत्त पडिक्कलने झेल घेतला, परंतु तो स्वतःवर नियंत्रण राखू शकला नाही आणि सीमापार गेला. नरीनला आणखी एक षटकार मिळाला. पुढच्या चेंडूवर मोहसिन खानने झेल टाकला. सुनील नरीनने यंदाच्या आयपीएलमध्ये आजच्या सामन्यापूर्वी ११ सामन्यांत ४५.२० च्या सरासरीने व १८३ च्या स्ट्राईक रेटने ४५२ धावा केल्या होत्या. त्यात १ शतक व ३ अर्धशतकांचा समावेश होता. तो दुसऱ्या शतकाकडे कूच करताना रवी बिश्नोईने त्याला माघारी पाठवले. यावेळी पडिक्कलने झेल घेतला. नरीन ३९ चेंडूंत ६ चौकार व ७ षटकारांसह ८१ धावांवर बाद झाला. आंद्रे रसेलला ( १२) आज वरच्या क्रमांकावर संधी मिळाली, परंतु कृष्णप्पा गौथमने अप्रतिम झेल घेऊन त्याला माघारी पाठवले.
युधवीर सिंगने त्याच्या पहिल्याच चेंडूवर अंगक्रिश रघुवंशीला ( ३२) माघारी पाठवून KKR ला मोठा दणका दिला. रिंकू सिंग ( १६) आजही फार काही नाही करू शकला. एकाना स्टेडियमवर २०० पार धावा करणारा KKR हा पहिला संघ ठरला. रमणदीप सिंग ( ६ चेंडूंत २५ धावा ) व कर्णधार श्रेयस अय्यर ( २३) यांनी LSG समोर २३६ धावांचे लक्ष्य ठेवले. कोलकाताने ६ बाद २३५ धावा केल्या.