IPL 2024, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Marathi Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ही फक्त फलंदाजांच्या दादागिरीने गाजताना दिसतेय. कोलकाताच्या ईडन गार्डनवर आज सुनील नरीन व फिल सॉल्ट यांच्या दे दना दन फटकेबाजीने मैदान दणाणून सोडले. या दोघांनी पहिल्या १० षटकांत १३७ धावा चोपल्या आणि KKR ची आयपीएल इतिहासातील पहिल्या १० षटकांतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. नरीनने आज पंजाब किंग्सच्या गोलंदाजांना यथेच्छ धुतले आणि त्यामुळे विराट कोहलीचं टेंशन वाढवले.
PBKS ने नाणेफेक जिंकून जेव्हा प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला तेव्हा अनेक तज्ज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले. ते का, याचे उत्तर सुनील नरीन आणि फिल सॉल्ट यांनी दिले. KKR च्या सलामीवीरांनी ३.५ षटकांत फलकावर पन्नास धावा चढवल्या. त्यानंतर ८व्या षटकात शतकी पल्ला पार केला. KKR ने ७६ धावा उभ्या केल्या आणि इडन गार्डनवरील ही पॉवर प्लेमधील दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. नरीन व सॉल्ट यांनी अनुक्रमे २४ व २५ चेंडूंत वैयक्तिक अर्धशतकं पूर्ण केली. राहुल चहरच्या गोलंदाजीवर नरीनला अम्पायरने पायचीत दिले होते, पण DRS मध्ये चेंडू किंचितसा स्टम्पवरून जात असल्याचे दिसले आणि पंजाबच्या गोलंदाजांनी डोक्यावर हात मारला. KKR ने पहिल्या १० षटकांत १३७ धावा उभ्या केल्या.