IPL 2024 Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Live : कोलकाताच्या ईडन गार्डनवर पुन्हा एकदा सुनील नरीन नामक कॅरेबियन वादळ घोंगावले. Sunil Narine ने उत्तुंग फटकेबाजी करताना राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांवर दडपण निर्माण केले होते. कोलकाता नाईट रायडर्सकडून अंगक्रिश रघुवंशीने त्याला उत्तम साथ दिली, परंतु इतर फलंदाजांनी माती खाल्ली. मात्र, नरीन मैदानावर उभा राहिला आणि खणखणीत शतक झळकावले.
राजस्थानने नाणेफेक जिंकून यजमान कोलकाताला प्रथम फलंदाजीला बोलावले आहे. रियान परागने पहिल्याच षटकात KKR ओपनर टीम सॉल्टचा झेल टाकला. पण, आवेश खानने त्याला मोठी खेळी करू दिली नाही. चौथ्या षटकात स्वतःच्याच गोलंदाजीवर आवेशने अविश्वसनीय झेल घेतला आणि सॉल्टला ( १०) माघारी पाठवले. पण, सुनील नरीन व अंगक्रिश रघुवंशी यांनी KKR ला सावरताना पॉवर प्लेमध्ये ५६ धावा फलकावर चढवल्या. नरीनच्या फटकेबाजीने KKR ने धावांची सरासरी दहाच्या वर कायम ठेवली होती. नरीनने षटकार खेचून २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने पहिल्या सहा षटकांत २ षटकार खेचले होते आणि IPL2024 मध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक १२ षटकार खेचण्याचा विक्रम नरीनने नावावर करताना रोहित शर्मा ( ११) व अभिषेक शर्मा ( ११) यांना मागे टाकले.
नरीन आणि रघुवंशी यांनी ४३ चेंडूंत ८५ धावांची भागीदारी करून KKR ला १०.४ षटकांत १०६ धावा करून दिल्या. कुलदीप सेन याने ही जोडी तोडली अन् रघुवंशी १८ चेंडूंत ५ चौकारांसह ३० धावांवर झेलबाद झाला. यंदाच्या पर्वात पहिल्या १० षटकांत १०० हून अधिक धावा करण्याची KKR ची ही चौथी वेळ आहे आणि त्यांनी SRH व MI ( ३) यांना मागे टाकले. कर्णधार श्रेयस अय्यरला ( ११) युझवेंद्र चहलने पायचीत केले. नरीनने त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली होती आणि आंद्रे रसेल नॉन स्ट्राईक एंडवरून ही फटकेबाजी पाहत होता. RR चा यशस्वी गोलंदाज आर अश्विनच्या ४ षटकांत ४९ धावा चोपल्या गेल्या.
चहलने टाकलेल्या १६व्या षटकात नरीनने ६,४,६,४ असे फटके खेचून ४९ चेंडूंत शतक पूर्ण केले.