IPL 2024 Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या गुणतालिकेच्या अव्वल स्थानी राजस्थान रॉयल्स कायम राहणार की कोलकाता नाईट रायडर्स त्यांचे पाय खेचणार? याचा फैसला लावणारा सामना ईडन गार्डनवर होत आहे. RR ने पाच सामने जिंकून १० गुण कमावले आहेत, तर KKR ५ पैकी ४ सामने जिंकून ८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. KKR ने आज विजय मिळवल्यास त्यांचेही सहा सामन्यांत १० गुण होतील, परंतु त्यांचा नेट रन रेट हा RR पेक्षा चांगला आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून यजमान कोलकाताला प्रथम फलंदाजीला बोलावले आहे.
या पर्वात KKR च्या ८ फलंदाजांनी किमान पन्नास धावा केल्या आहेत, त्यापैकी सहा जणांचा स्ट्राईक रेट हा १५० हून अधिक आहे आणि एकाचा १४४.४४ असा आहे. पण, श्रेयस अय्यरला १२०.५६च्या सरासरीने १२९ धावा करता आल्या आहेत. आयपीएल २०२४ मध्ये प्रत्येक १२ चेंडूंनंतर युझवेंद्र चहल एक विकेट घेतोय आणि यंदाच्या पर्वात त्याचा स्ट्राईक रेट हा इतर गोलंदाजांच्या तुलनेत सरस आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३५० बळींचा आकडा गाठण्यासाठी त्याला ३ विकेट्सची गरज आहे. आजच्या सामन्यात जॉस बटलर व आर अश्विन यांचे पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे ते मागील सामन्याला मुकले होते.
रियान परागने पहिल्याच षटकात KKR ओपनर टीम सॉल्टचा झेल टाकला. पण, आवेश खानने त्याला मोठी खेळी करू दिली नाही. चौथ्या षटकात स्वतःच्याच गोलंदाजीवर आवेशने अविश्वसनीय झेल घेतला आणि सॉल्टला ( १०) माघारी पाठवले. या झेलनंतर आवेशने RR कर्णधार संजू सॅमसनकडे बोट दाखवून कॅच असा घ्यायचा, हे सूचवले. त्यानंतर आवेशने संजूचा ग्लोव्ह्ज घेऊन चेंडू त्यात ठेवला. कारण मागच्या सामन्यात आवेशच्याच गोलंदाजीवर उत्तुंग उडालेला चेंडू टिपण्यासाठी तो व संजू यांच्या टक्कर झाली होती. तेव्हा प्रतिस्पर्धी फलंदाजाला जीवदान मिळालेलं.