IPL 2024, SRH vs GT Live Marathi : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. हैदराबादमध्ये पावसाची बॅटींग पाहता, ही मॅच रद्द करावी लागेल अशी स्थिती निर्माण झाली होती. पण, पावसाने काहीकाळासाठी विश्रांती घेतल्याने ८ वाजता टॉस होण्याची घोषणा झाली. पण, कव्हर्स हटवायला सुरुवात होताच पावसाची पुन्हा एन्ट्री झाली आणि तो थांबलाच नाही. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. GT चा हा सलग दुसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक ६१ षटकार लागले आहेत आणि ही एखाद्या स्टेडियमवरील संयुक्त अव्वल कामगिरी आहे आणि हा विक्रम आज मोडला जाऊ शकतो. वृद्धीमान सहा आणि डेव्हिड मिलर या दोघांना आयपीएलमध्ये ३००० धावा पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे ६७ व ७६ धावा हव्या आहेत. भुवनेश्वर कुमारने एक विकेट घेताच तो ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स पूर्ण करणारा भारताचा पहिला जलदगती गोलंदाज ठरेल. युझवेंद्र चहल, पियूष चावला आणि आर अश्विन या फिरकीपटूंनी हा पराक्रम केला आहे.
या सामन्यापूर्वी हैदराबाद १२ सामन्यांत ७ विजय मिळवून १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर होते. त्यांना उर्वरित दोन सामने जिंकून १८ गुणांसह क्वालिफायर १ साठी दावा सांगण्याची संधी होती. पण, आजची लढत रद्द झाल्याने त्यांना व गुजरात टायटन्सला प्रत्येकी १ गुण मिळाले. त्यामुळे SRH १५ गुणांसह प्ले ऑफसाठी पात्र ठरले आहेत. SRH vs GT सामना रद्द झाल्याने दिल्ली कॅपिटल्सच्या उरलेल्या आशा पाण्यात मिळाल्या आहेत, तर लखनौ सुपर जायंट्स व गुजरात टायटन्स हेही स्पर्धेबाहेर फेकले गेले आहेत. मुंबई इंडियन्स व पंजाब किंग्स आधीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. चेन्नई सुपर किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोनच संघांना SRH ला मागे टाकण्याची संधी आहे. त्यामुळे CSK vs RCB यांच्यातला विजेता प्ले ऑफच्या तिसऱ्या क्रमांकाची जागा पक्की करेल.