IPL 2024 LSG vs DC Live Match Updates | लखनौ: सलग तीन सामने जिंकून विजयाच्या पटरीवर असलेल्या लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करण्यात दिल्ली कॅपिल्सला यश आले. लखनौने दिलेल्या १६८ धावांच्या आव्हानाचा यशस्वीरित्या पाठलाग करत दिल्लीने यंदाच्या हंगामातील दुसरा विजय मिळवला. विजयाची हॅटट्रिक मारणाऱ्या लखनौला आपल्या घरच्या मैदानावर दिल्लीकडून पराभव स्वीकारावा लागला. पृथ्वी शॉ, रिषभ पंत आणि जेक फ्रेजर-मॅकगर्क यांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने दोन गुण मिळवले. (IPL 2024 News) दिल्लीच्या संघाने १८.१ षटकांत ४ बाद १७० धावा केल्या. खरं तर प्रथमच दिल्लीने १६० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौला पराभवाची धूळ चारली.
दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी शॉने (३२), डेव्हिड वॉर्नर (८), जेक फ्रेजर-मॅकगर्क (५५), रिषभ पंत (४१), ट्रिस्टन स्टब्स (नाबाद १५ धावा) आणि शाई होपने नाबाद (११) धावा केल्या. यजमान लखनौकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक (२) बळी घेतले, तर नवीन-उल-हक आणि यश ठाकूर यांना १-१ बळी घेता आला. दिल्लीने यंदाच्या हंगामातील दुसरा विजय तर लखनौने दुसरा पराभव स्वीकारला. पाहुण्या संघाकडून जेक फ्रेजर-मॅकगर्कने निर्णायक खेळी केली. त्याने ५ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ३५ चेंडूत ५५ धावा केल्या.
तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करताना लखनौकडून डीकॉकने (१९), लोकेश राहुल (३९), देवदत्त पडिक्कल (३), मार्कस स्टॉयनिस (८), निकोलस पूरन (०), दीपक हुड्डा (इम्पॅक्ट प्लेअर (१०), कृणाल पांड्या (३), अर्शद खान (नाबाद २० धावा) आणि आयुष बदोनीने नाबाद ५५ धावा केल्या. लखनौने निर्धारित २० षटकांत ७ बाद १६७ धावा केल्या होत्या. बदोनीने १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३५ चेंडूत नाबाद ५५ धावा कुटल्या. दिल्लीकडून कुलदीप यादवने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर खलील अहमद (२) आणि इशांत शर्मा आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी १-१ बळी घेता आला.
लखनौचा संघ -लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डीकॉक, देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर.
दिल्लीचा संघ - रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, जेक फ्रेजर-मॅकगर्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.