Mayank Yadav record IPL 2024 LSG vs RCB: लखनौ सुपर जायंट्स संघाने मंगळवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा दणक्यात पराभव केला. लखनौच्या संघाने क्विंटन डी कॉकच्या ८१ धावा आणि निकोलस पूरनच्या नाबाद ४० धावांच्या जोरावर २० षटकांत ५ बाद १८१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगलोर संघाची गाडी सुरुवातीपासूनच रुळावरून घसरली. महिपाल लोमरॉरच्या सर्वाधिक ३३ धावांच्या खेळीमुळे त्यांना कशीबशी १५३ धावांपर्यंत मजल मारता आली. पण त्यातही त्यांचा संपूर्ण संघ बाद झाला. लखनौच्या मयंक यादवने आपल्या वेगाची जादू दाखवून देत मोठा विक्रम केला.
वेगवान गोलंदाज मयंक यादवने पहिल्या सामन्यात सामनावीराचा किताब पटकावला होता. त्यात त्याने ३ बळी घेतले होते. दुसऱ्या सामन्यातही मयंकने बंगलोरच्या संघाला ३ धक्के दिले आणि पुन्हा एकदा सामनावीराचा किताब पटकावला. त्यासोबतच त्याने महत्त्वाचा पराक्रम केला. लखनौविरुद्ध तीन बळी घेत मयंक यादवने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये प्रत्येकी तीन किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो आता सहावा गोलंदाज ठरला. याआधी लसिथ मलिंगा, अमित सिंग, मयंक मार्कंडेय, केवन कूपर आणि जोफ्रा आर्चर या गोलंदाजांनी अशी कामगिरी करून दाखवली होती. त्यांच्या पंगतीत मयंक यादवनेही स्थान पटकावले.
सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम मयंकच्या नावावर
RCB विरुद्धच्या सामन्यात मयंकने या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. त्याने स्वतःचाच विक्रम मोडला. पंजाबविरुद्धच्या सामन्यात मयंकने ताशी 155.8 किमी वेगाने चेंडू टाकला होता. त्याच वेळी, बंगलोरविरुद्ध, त्याने ताशी 156.7 किमी वेगाने चेंडू फेकून स्वतःचा विक्रम मोडला आणि नवा विक्रम प्रस्थापित केला.