LSG Owner Sanjiv Goenka : लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर केएल राहुलला फटकारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. हैदराबादकडून लखनऊनला १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे संजीव गोयंका यांनी केएल राहुलला झापलं होतं. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाला. व्हिडीओ व्हायरल होताच क्रिकेट चाहत्यांनी आपला रोष व्यक्त केला. संजीव गोएंका यांनी मैदानावर असे करायला नको होतं म्हटलं. मात्र आता या प्रकरणाबाबत लखनऊ सुपर जायंट्सच्या मुख्य प्रशिक्षकाने आपलं मत मांडले आहे.
लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी चालू आयपीएल २०२४ मधील या ताज्या चर्चेच्या विषयावर मौन सोडलं आहे. गेल्या आठवड्यात सनरायझर्स हैदराबादकडून झालेल्या पराभवानंतर संघाचे मालक संजीव गोएंका आणि कर्णधार केएल राहुल यांच्यातील चर्चेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सनरायझर्स हैदराबादने लखनऊला १० गडी राखून पराभूत केल्यानंतर गोयंका राहुलला फटकार असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत होते.
"हे एका चहाच्या कपामधले वादळ आहे. भारताबद्दल मला भुरळ घालणारी गोष्ट म्हणजे क्रिकेटबद्दलची ही अतुलनीय आवड. मिस्टर गोएंका वेगळे नाहीत. मी वेगळा नाही. केएल वेगळा नाही. त्या दिवशी आम्ही आखलेली योजना पूर्ण झाली नाही. खेळानंतर गोयंका मैदानात आले आणि त्यांनी केएलला विचारले की, काय झाले? आपला प्लॅन ज्याबद्दल आपण बोललो त्याबद्दल काही झाले नाही. आता काय करू? त्यानंतर मग आम्ही त्यावर बोललो," असे जस्टिन लँगर यांनी म्हटलं.
"व्हिडीओमध्ये आवाज बंद होता त्यामुळे जे काही बोलले झाले ते कोणी ऐकले नाही. कदाचित ते खूप आक्रमक दिसले असेल, परंतु ते खरोखरच खूप शांत होते, असेही लँगर म्हणाले. दुसरीकडे, सहाय्यक प्रशिक्षक लान्स क्लुजनर यांनीही या प्रकाराबाबत भाष्य केलं. मला वाटतं की, हे दोन क्रिकेटप्रेमींमधील संभाषण होतं. आम्हाला थेट संभाषण करायला आवडतं. मला यात काही अडचण वाटली नाही. अशा संभाषणामुळे टीम अधिक चांगला होते. आमच्यासाठी ही कोणत्याही प्रकारे मोठी गोष्ट नाही. राहुल चांगल्या ठिकाणी असून गेल्या अनेक सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे," असं लान्स क्लुजनर यांनी म्हटलं.