Shamar Joseph LSG: आयपीएल २०२४ साठी लखनौ सुपर जायंट्सच्या संघात स्टार गोलंदाजाचा समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा शामर जोसेफ लखनौच्या ताफ्यात दिसणार आहे. आगामी आयपीएल हंगामासाठी लखनौ सुपर जायंट्सने मार्क वुडच्या जागी शामर जोसेफची नियुक्ती केली आहे. लखनौच्या फ्रँचायझीने ३ कोटी रूपये देऊन घातक गोलंदाजाला आपल्या ताफ्यात घेतले.
आयपीएलच्या आगामी हंगामासाठी आता काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. लखनौच्या संघात वेस्ट इंडिजच्या स्टार गोलंदाजाचा समावेश झाल्याने संघाच्या गोलंदाजीची ताकद वाढली आहे. अलीकडेच शामर जोसेफने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी करून आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. गॅबा येथे झालेल्या कसोटी सामन्यात त्याने सामन्याच्या दुसऱ्या डावात सर्वाधिक ७ बळी घेतले होते. खरं तर जोसेफ पहिल्यांदाच आयपीएमध्ये दिसणार आहे.
वेस्ट इंडिजच्या शामर जोसेफने ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणाचा कसोटी सामना खेळला. या सामन्यात त्याने ५ बळी घेतले. शामरची कामगिरी पाहून त्याचे सहकारी आणि व्यवस्थापन प्रभावित झाले. पुढच्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही त्याचा समावेश करण्यात आला. या सामन्यात शामरने वेस्ट इंडिजला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. पहिल्या डावात शामरने एक बळी घेतला. पण दुसऱ्या डावात ७ बळी घेण्यात त्याला यश आले. दुसऱ्या डावात त्याने ११.५ षटकांत ६८ धावा देत ७ बळी घेतले अन् कॅरेबियन संघाने कांगारूंना नमवले.