IPL 2024, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : महेंद्रसिंग धोनी याने पुन्हा एकदा मैदान गाजवले. आपल्या लाडक्या माहीला पाहण्यासाठी लखनौच्या स्टेडियमवर पिवळ्या जर्सीतील चाहतेच अधिक दिसले.. त्यामुळे अनेकांना हा सामना CSK च्या चेपॉकवर सुरू आहे की काय, असा भास होत होता. त्यात धोनीने खेळलेले ९ चेंडू हे जणू चाहत्यांचे स्वप्न साकार करणारे होते. त्याने खेचलेला '360°' षटकारासमोर सूर्यकुमार यादव व एबी डिव्हिलियर्स यांचेही फटके पानी कम चाय वाटू लागले.
LSG च्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना CSK च्या धावांवर वेसण घातले होते. पण, रवींद्र जडेजाने संयमी खेळ करताना चेन्नईच्या डावाला आकार दिला. अजिंक्य रहाणे ( ३६), मोईन अली ( ३०) यांनी लावलेल्या हातभारामुळे CSK सन्मानजनक आव्हान उभे करून दिले. पण, खरी मजा जेव्हा महेंद्रसिंग धोनी मैदानावर आला तेव्हा आली. लखनौचे प्रेक्षक धोनीची आतुरतेने वाट पाहत होते आणि धोनीने त्यांच्या विश्वासाला तडा नाही जाऊ दिला. धोनीने ९ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह २८ धावा चोपून चेन्नईला ६ बाद १७६ धावांपर्यंत पोहोचवले. जडेजाने ४० चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ५७ धावा केल्या.
LSGच्या कृणाल पांड्याने २ विकेट्स घेतल्या, तर मोहसीन खान, यश ठाकूर, मार्कस स्टॉयनिस व रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. महेंद्रसिंग धोनीने आजच्या खेळीच्या जोरावर आयपीएलमध्ये यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून ५००० धावा पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक ९२ वेळा तो नाबाद राहिला आहे. त्यानंतर रवींद्र जडेजाचा ( ७५) क्रम येतो. आयपीएलमध्ये १९ व २०व्या षटकात सर्वाधिक १०१ षटकारही धोनीच्या नावावर आहेत आणि किरॉन पोलार्ड ( ५७) दुसरा सर्वोत्तम खेळाडू आहे