IPL 2024, Lucknow Super Giants vs Gujarat Titans Live Update : लखनौ सुपर जायंट्सने रविवारी घरच्या मैदानावर उल्लेखनीय पुनरागमन करून १६३ धावांचा यशस्वी बचाव केला. गुजरात टायटन्सला शुबमन गिल व साई सुदर्शन यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. पण, यश ठाकूर ( 5-30) व कृणाल पांड्या ( ३-११) यांनी टिच्चून मारा करून मॅचला कलाटणी दिली. आयपीएल स्पर्धेतील LSGचा हा GT वरील पहिलाच विजय ठरला. यापूर्वी एकदाही लखनौला गुजरातला हरवता आले नव्हते.
शुबमन गिल व साई सुदर्शन यांनी गुजरातला चांगली सुरुवात करून देताना पहिला पॉवर प्लेमध्ये ५४ धावा फलकावर चढवल्या. पण, यश ठाकूरने ही जोडी तोडताना शुबमनचा ( १९) त्रिफळा उडवला. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या केन विलियम्सनला ( १) रवी बिश्नोईने अविश्वसनीय झेल घेऊन माघारी पाठवले. त्यानंतर कृणाल पांड्याने एकाच षटकात दोन धक्के देताना साई सुदर्शनला (३१) व बी शरथला (२) माघारी पाठवले. बिनबाद ५४ वरून गुजरातची अवस्था ४ बाद ६१ अशी झाली. कृणालने तिसरी विकेट घेताना दर्शन नळकांडेला ( १२) माघारी पाठवत गुजरातला कोंडित पकडले.
तत्पूर्वी, उमेश यादव ( २-२२) व दर्शन नळकांडे ( २-२१) यांनी LSGला डबल धक्के देताना गुजरात टायटन्सला पकड मिळवून दिली. क्विंटन डी कॉक व देवदत्त पडिक्कल यांना उमेशने माघारी पाठवले. लोकेश राहुल ( ३३) व मार्कस स्टॉयनिस ( ५८) यांनी LSG चा डाव सावरला होता, परंतु GT च्या गोलंदाजांनी त्यांच्या धावगतीवर अंकुश ठेवले होते. दर्शन नळकांडेने या दोन्ही सेट फलंदाजांना माघारी पाठवले. निकोलस पूरनने २२ चेंडूंत ३ षटकारांसह नाबाद ३२ धावा केल्या आणि लखनौला ५ बाद १६३ धावांपर्यंत पोहोचवले.