IPL 2024 MI vs DC: सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. सोमवारी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या एक दिवस आधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा त्याच्या रेंज रोव्हरमधून (Rohit Sharma Range Rover) प्रवास करताना दिसतो. यावेळी त्याच्या कारच्या नंबर प्लेटने सर्वांचे लक्ष वेधले. हिटमॅनच्या गाडीचा नंबर 'MH01EQ0264' असा आहे. रोहितच्या या नंबर प्लेटला त्याच्या ऐतिहासिक खेळीशी जोडले जात आहे. रोहितने वन डेमध्ये श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात २६४ धावांची खेळी केली होती. (Rohit Sharma Video)
२०१४ मध्ये रोहितने श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात वन डे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळी केली होती. त्याने १७३ चेंडूत ३३ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने २६४ धावा कुटल्या होत्या. या खेळीला रोहितच्या रेंज रोव्हरच्या नंबर प्लेटशी जोडले जात आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात प्रथमच मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत आहे. गुजरात टायटन्समधून आलेल्या हार्दिकला कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित शर्मा कर्णधार नसला तरी संघाचा भाग आहे.
खरं तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यापासून हार्दिक पांड्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर चाहते त्याच्यावर टीका करताना दिसले. याशिवाय मुंबईचा सलामीचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. इथे देखील त्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढल्यामुळे माजी कर्णधार विरूद्ध विद्यमान कर्णधार असे वातावरण तयार करण्यात आले आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत केवळ दोन सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या अपयशी ठरल्याचे दिसले. जसप्रीत बुमराहला पहिले षटक का दिले जात नाही असा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात यजमान हैदराबादच्या संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्यांनी निर्धारित २० षटकांत ३ बाद २७७ धावा करून इतिहास रचला.