MI vs GT IPL 2024: आयपीएलचा सतरावा हंगाम विविध कारणांनी खास आहे. (IPL 2024 News) त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे मुंबई इंडियन्स... खरं तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सची गणना केली जाते. मुंबईने पाचवेळा आयपीएल जिंकण्याची किमया साधली. पण, यंदा प्रथमच पलटन हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात खेळत आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिककडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गुजरात टायटन्सशी ट्रेड करून मुंबईच्या फ्रँचायझीने हार्दिकला आपल्या ताफ्यात घेतले.
आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (MI vs GT) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होत आहे. आजचा सामना दोन्हीही संघांसाठी खूप खास असेल यात शंका नाही. युवा शुबमन गिल विरूद्ध अनुभवी हार्दिक पांड्या अशी लढत पाहायला मिळेल. या सामन्यापूर्वी मुंबईच्या फ्रँचायझीने माजी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये रोहित युवा खेळाडूंविषयी भाष्य करताना दिसत आहे.
मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रोहित शर्माने म्हटले की, आम्ही अनेक खेळाडूंना लिलावात खरेदी केले आहे. काही नवे चेहरे आणि युवा खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे, ज्यांनी देशांतर्गत क्रिकेटशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. मला आशा आहे की, ते आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित करतील. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या मी सामन्यापूर्वी करतो आणि मला वाटते की, मी आता सर्वकाही केले आहे. आता केवळ काही बाबी राहिल्या आहेत ज्या मी करेन आणि त्यासाठी तयार आहे.
दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएची ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी हार्दिक पांड्याची घरवापसी झाली आहे. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने सलग दोन हंगामात अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. २०२२ मध्ये हार्दिकसेनेने पदार्पणाच्या हंगामात किताब जिंकण्याची किमया साधली.