Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सचा संघ सध्या अतिशय बिकट अवस्थेत आहे. तब्बल १० सामने खेळल्यानंतरही मुंबईच्या संघाला केवळ ३ सामने जिंकता आलेले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ ६ गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. मुंबईच्या संघाला जर प्ले ऑफ्सच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर त्यासाठी त्यांना आजचे आणि यापुढे सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. तसेच, इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागणार आहे. आज मुंबईचा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाशी होणार आहे. या सामन्यासाठी मुंबईच्या संघात दोन महत्त्वाचे बदल केले जाण्याची शक्यता आहे.
कोलकाता विरूद्धच्या सामन्यासाठी मुंबईच्या संघात समतोल साधण्याची गरज आहे. अशा वेळी अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नबी याला संघातून बाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे. नबीने गेल्या काही सामन्यात गोलंदाजीत फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. तसेच फलंदाजीतही तो आठव्या क्रमांकावर बॅटिंगला येत असल्याने त्याच्या खेळावर मर्यादा आल्या आहेत. अशा परिस्थितीत नबीच्या जागी रोमारियो शेपर्ड याला संघात स्थान दिले जाऊ शकते. मुंबईच्या फलंदाजांनी गेल्या काही सामन्यातील कामगिरी पाहिल्यास, शेपर्ड शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करण्यास सक्षम आहे. त्याने दिल्ली विरूद्धच्या सामन्यात याची झलक दाखवून दिली होती. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळू शकते.
गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास, आतापर्यंत आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण न झालेल्या आकाश मढवालला देखील संघात स्थान दिले जाऊ शकते. आकाश मढवालने सामन्यात बरेचदा विकेट घेण्याची किमया दाखवून दिली आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. आकाश मढवालच्या जागी नेहल वढेरा किंवा नुवान तुषारा या दोघांपैकी एकाला संघाबाहेर केले जाऊ शकते. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून या दोघांना संघात स्थान देऊन सामन्याच्या गरजेनुसार यातील एका खेळाडूचा वापर केला जाऊ शकतो.
कोलकाता विरूद्ध मुंबई इंडियन्सचा संभाव्य संघ- रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, रोमारियो शेपर्ड, पियुष चावला, गेराल्ड कोईत्झे, जसप्रीत बुमराह, आकाश मढवाल
इम्पॅक्ट खेळाडू- नेहाल वढेरा, नुवान तुषारा, डेवाल्ड ब्रेव्हिस, मोहम्मद नबी