Join us  

IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय

Mitchell Starc, IPL 2024 KKR beat Mumbai Indians: मिचेल स्टार्कने सामन्याला 'फिनिशिंग टच' देत ४ बळी घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 11:27 PM

Open in App

Mitchell Starc, IPL 2024 KKR beat Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या संघाविरूद्ध वानखेडेच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सने दमदार विजय मिळवला. मिचेल स्टार्कचे ४ बळी आणि इतर गोलंदाजांची मिळालेली साथ याच्या बळावर KKRने २४ धावांनी विजय मिळवला. या पराभवासोबतच मुंबई इंडियन्सचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले. तर कोलकाता संघाने वानखेडेच्या मैदानावर २०१२ नंतर तब्बल १२ वर्षांनी विजय मिळवला. ७० धावांची झुंजार खेळी करणाऱ्या व्यंकटेश अय्यरला सामनावीराचा किताब देण्यात आला.

सलामीवीर इशान किशन सोबत इम्पॅक्ट प्लेयर म्हणून रोहित शर्मा फलंदाजीला आला. इशान किशन १३ धावा तर रोहित शर्मा ११ धावांवर माघारी परतला. नवख्या नमन धीरला ११ धावाच करता आल्या. तर नेहाल वढेराही ६ धावांवर बाद झाला. अनुभवी तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनीही निराशा केली. तिलक वर्मा ४ तर हार्दिक पांड्या १ धाव काढून तंबूत परतला. त्यामुळेच मुंबईची अवस्था ६ बाद ७१ अशी झाली होती. पण सूर्यकुमारने तुफान फटकेबाजी केली. त्याने ३५ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५६ धावा केल्या. मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला. सूर्यकुमारनंतरही टीम डेव्हिड कडून मुंबईच्या चाहत्यांना अपेक्षा होत्या. पण तोदेखील २० चेंडूत २४ धावा काढून बाद झाला. त्यानंतर पियुष चावला शून्यावर बाद झाला. त्यानंतर मिचेल स्टार्कने कोईत्झेचा त्रिफळा उडवत कोलकाताला २४  धावांनी विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना कोलकाताच्या डावाची सुरुवात खराब झाली. फिल सॉल्टने ५, अंगक्रिशने १३, श्रेयस अय्यरने ६ तर सुनील नारायणचा ५ धावा केल्या. त्यानंतर रिंकू सिंगही ९ धावांवर बाद झाला. या धक्क्यांनंतर मनिष पांडे आणि व्यंकटेश अय्यर या जोडीने डाव सावरला. या दोघांनी ८७ धावांची भागीदारी केल्यानंतर जोडी फुटली. मग आलेला आंद्रे रसेलही धावबाद झाला. रसेल पाठोपाठ रमणदीप सिंग (२), मिचेल स्टार्क (०) हे दोघेही बाद झाले. व्यंकटेश अय्यर शेवटपर्यंत झुंज देत होता. ५२ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७० धावा केल्या. बुमराहने त्याला त्रिफळाचीत करत कोलकाताचा डाव १६९ धावांवर संपवला. मुंबई इंडियन्सकडून नुवान तुषारा, जसप्रीत बुमराहने ३-३, हार्दिक पांड्याने २ तर पियुष चावलाने १ गडी बाद केला.

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सहार्दिक पांड्यारोहित शर्माकोलकाता नाईट रायडर्स