Nuwan Thushara Mumbai Indians, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. यंदाच्या हंगामात २६२ धावांच्या आव्हनाचा पाठलाग करणाऱ्या कोलकाता संघाने पहिल्या तीन षटकांतच आपले तीन गडी गमावले. तर पॉवरप्लेमध्ये ४ बाद ५७ अशी अवस्था करून घेतली. वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्सकडून नुवान तुषाराने भेदक मारा करत कोलकाताला सुरूवातीलाच तीन दणके दिले. त्यामुळे कोलकाताची अवस्था ३ बाद २८ झाली. तुषाराने फिल सॉल्ट, अंगक्रिश रघुवंशी आणि श्रेयस अय्यर तिघांना स्वस्तात तंबूत धाडले. त्यानंतर पॉवरप्लेच्या पाचव्या षटकात कर्णधार हार्दिक पांड्यानेही (Hardik Pandya) सुनील नारायणला क्लीन बोल्ड केले.
मुंबईकडून गोलंदाजीची सुरुवात करणाऱ्या नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फॉर्ममध्ये असलेल्या फिल सॉल्टला ५ धावांवर माघारी पाठवले. मोठा फटका मारताना फिल सॉल्टचा झेल उडाला. मैदानावर थोडासा गोंधळ झाला पण अखेर तिलक वर्माने तो झेल टिपला. त्यानंतर तिसऱ्या षटकात दुसऱ्या चेंडूवर तुषाराने अंगक्रिश रघुवंशीला १३ धावांवर सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. तर त्याच षटकात शेवटच्या चेंडूवर कर्णधार श्रेयस अय्यर देखील बाद झाला. अवघ्या ६ धावांवर खेळत असताना त्यानेही सूर्यकुमार यादवच्या हाती झेल दिला. त्यानंतर सुनील नारायण फटकेबाजी करत होता. पण हार्दिकने त्याला ८ धावांवर माघारी पाठवले.
दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने संघात एक महत्त्वाचा बदल करत मोहम्मद नबीच्या जागी नमन धीर याला संघात स्थान दिले. तसेच, रोहित शर्माला फिल्डिंगच्या वेळी प्लेईंग XI मध्ये स्थान न देता इम्पॅक्ट खेळाडू म्हणून संघात ठेवले. मुंबई आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत झालेल्या सामन्यांत मुंबईने ७१% सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकून प्लेऑफ्सच्या स्पर्धेत टिकून राहण्याचा मुंबईचा मानस आहे.