IPL 2024 MI vs RCB: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेला सामना विविध कारणांनी खास ठरला. सांघिक खेळीच्या जोरावर यजमान मुंबईच्या संघाने मोठा विजय मिळवला. (MI vs RCB Match Updates) सलग दुसरा विजय मिळवताना मुंबईकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने कमाल केली. आव्हानाचा पाठलाग करताना इशान किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी सांघिक खेळी करून आरसीबीला पराभवाची धूळ चारली. (IPL 2024 News)
दुखापतीतून सावरल्यानंतर सूर्यकुमार यादवने आपल्या दुसऱ्याच सामन्यात चमक दाखवली. दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात स्वस्तात बाद झालेल्या सूर्याने गुरूवारी केवळ १७ चेंडूत अर्धशतक झळकावले. सूर्याची खेळी पाहून भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग प्रभावित झाला. भज्जीने त्याची तुलना मिस्टर ३६० एबी डिव्हिलियर्सशी केली. सूर्या आणि डिव्हिलियर्स मैदानाच्या चारही बाजूला फटके मारण्यात माहिर आहेत. सूर्या डिव्हिलियर्सपेक्षा भारी असल्याचे हरभजनने सांगितले.
मुंबई इंडियन्ससाठी सर्वात जलद (१७ चेंडू) अर्धशतक ठोकणारा खेळाडू म्हणून सूर्यकुमार यादवच्या नावाची नोंद झाली आहे. आरसीबीने दिलेल्या १९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग मुंबईने केवळ १५.३ षटकांत पूर्ण केला. 'स्टार स्पोर्ट्स'वर बोलताना हरभजनने सांगितले की, मी अशा पद्धतीने मैदान गाजवताना कोणाला पाहिले नाही. ज्यापद्धतीने सूर्याने फलंदाजी केली ते अप्रतिम होते. अविश्वसनीय... तुम्ही अशा फलंदाजाला नेमका कुठे चेंडू टाकाल? मला आनंद आहे की, मी आता क्रिकेट खेळत नाही, सूर्या खेळत असताना गोलंदाजी कशी करायची हा मोठा प्रश्न आहे.
मुंबईचा सलग दुसरा विजय एबी डिव्हिलियर्ससोबत सूर्यकुमारची तुलना करताना भज्जी म्हणाला की, सूर्यकुमार यादव हा एक वेगळाच खेळाडू आहे. त्याने एकदा लय पकडली की कोणीच वाचू शकत नाही. आम्ही सर्वांनी एबी डिव्हिलियर्सची फलंदाजी पाहिली आहे आणि त्याच्यासारखा अद्भुत खेळाडू कोणीच नव्हता. पण, जेव्हा सूर्याला पाहतो तेव्हा वाटते की तो डिव्हिलियर्सपेक्षा चांगला आहे. जर मी एखाद्या संघाचा भाग असतो तर सूर्या लिलावात येताच त्याच्या खरेदीसाठी आग्रह धरला असता. पण असे कधीच होणार नाही.
दरम्यान, गुरूवारी झालेल्या सामन्यात आरसीबीने मुंबईला १९७ धावांचे आव्हान दिले होते. मुंबई इंडियन्सने अवघ्या १५.३ षटकांत लक्ष्य गाठत सलग दुसरा विजय मिळवला. यजमान मुंबई इंडियन्सच्या संघाने फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. जसप्रीत बुमराहने ५ बळी घेत आरसीबीच्या फलंदाजीची कंबर मोडली. आरसीबीविरूद्धच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स क्रमवारीत ७व्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर आरसीबी नवव्या स्थानी आहे.