IPL 2024, MI vs RCB : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये गुरुवारी मुंबई इंडियन्स त्यांचा चौथा सामना खेळणार आहे. घरच्या मैदानावर सलग दुसरा सामना खेळताना त्यांच्यासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान असणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखील Mumbai Indians ची सुरूवात चांगली झाली नाही. सलग तीन पराभव मिळवल्यानंतर MI ला अखेर मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून यंदाच्या पर्वातील विजयाचे खाते उघडता आले. ही मालिका कायम राखण्यात मुंबई इंडियन्स सज्ज आहेत. पण, सामन्याच्या पूर्वसंध्येला रात्री माजी कर्णधार रोहित शर्मा व संघ मालक आकाश अंबानी एकाच गाडीतून वानखेडे स्टेडियमला पोहोचल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
MI फ्रँचायझीने ट्रेंडिंग विंडोत हार्दिकला गुजरात टायटन्सकडून मोठी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात परत आणले. इथपर्यंत ठिक होतं, परंतु त्यांनी रोहितकडून कर्णधारपद काढून घेताना हार्दिकला कॅप्टन केले. त्यामुळे चाहत्यांच्या रोषाचा फ्रँचायझीला व हार्दिकलाही सामना करावा लागला. MI च्या पहिल्या तीन सामन्यांत चाहत्यांनी हूटिंग करून हार्दिकवरील निषेध व्यक्त केला आणि त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला. संघाला सलग तीन सामन्यांत हार पत्करावी लागली. त्यानंतर सहा दिवसांच्या ब्रेकसाठी MI चे खेळाडू जामनगरमध्ये गेले आणि रिफ्रेश होऊन पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर भारी पडले.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने दमदार फलंदाजी केली होती. त्या सामन्यानंतर तो म्हणाला होता की, "फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करून दाखवली. ही अशी गोष्ट आहे ज्यासाठी आपण सर्वजण पहिल्या सामन्यापासून प्रयत्नशील आहोत. फलंदाजांच्या संपूर्ण युनिटने चागंली कामगिरी केली आणि यासाठी त्यांचे कौतुक. वैयक्तिक कामगिरीने काही फरक पडत नाही. जर आपण संघाचे ध्येय पाहिले तर आपण अशा प्रकारचा खेळ करून ध्येय साध्य करू शकतो. फलंदाजी प्रशिक्षक (पोलार्ड), मार्क (बाऊचर) आणि कर्णधार (हार्दिक) यांना हेच हवे आहे."
रोहितचा फॉर्म परतल्याने फ्रँचायझी खूश होतेच आणि त्यांना संघाच्या विजयाची लय कायम राखण्यासाठी रोहितचा फॉर्म महत्त्वाचा आहे, हेही माहित आहे. त्यात आज अचानक रात्री आकाश अंबानी व रोहित एकाच गाडीतून वानखेडे स्टेडियमला दाखल झाल्याने काहीतरी खलबत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पण, सध्यातरी MI कर्णधार बदलाच्या विचारात नसल्याचे वृत्त मिळतेय. त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा कितपत खरी हे उद्या कळेल.