IPL 2024, MI vs SRH Live Marathi : मुंबई इंडियन्सचे ३ फलंदाज ३१ धावांवर माघारी पाठवल्यानंतर सनरायझर्स हैदराबादला बाजी आपलीच असे वाटले होते. पण, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी SRH ला जमिनीवर आपटले. सूर्याने मैदानाचा असा कोणताच कोपरा शिल्लक ठेवला नव्हता, जिथे चौकार-षटकार लागले नसतील. तिलकने त्याला संयमी खेळ करून उत्तम साथ दिली. या जोडीने हैदराबादच्या तोंडचा घास पळवला अन् विजय मिळवून हैदराबादसोडून अन्य संघांना अप्रत्यक्ष मदत केली.
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
पॅट कमिन्स आणि भुवनेश्वर कुमार या अनुभवी गोलंदाजांनी मुंबई इंडियन्सला सडेतोड उत्तर दिले होते. सनरायझर्स हैदराबादच्या या गोलंदाजांनी सलग दोन षटकं निर्धाव टाकली आणि यजमानांवर दडपण निर्माण केले. त्याचा रिझल्ट हा विकेट्स मिळाल्या.. इशान किशन (९) , रोहित शर्मा ( ४) व नमन धीर (०) हे अपयशी ठरले. १.३ षटकांत मुंबईच्या २६ धावा झाल्या होत्या, परंतु पुढील ३ विकेट्स या केवळ ५ धावांत पडल्या. मुंबईला ३१ धावांवर दोन धक्के बसले आणि यापैकी १८ धावा या अतिरिक्त आहेत. कमिन्सने त्यानंतर पुढच्या तीन चेंडूंवर सूर्यकुमार यादवला चकवले. सूर्याला काहीच समजेनासे झाले. पण, नंतर सूर्या व तिलक वर्मा यांनी आक्रमणाला आक्रमणानेच उत्तर दिले आणि २८ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. सूर्याने मनगटाच्या जोरावर मारलेले षटकात डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.
सूर्या व तिलक यांची जोडी तोडण्यात हैदराबादच्या गोलंदाजांना सपशेल अपयश आलेले दिसले आणि मुंबईने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. ३ बाद ३१ वरून या दोघांनी संघाला पहिल्या १० षटकांत ३ बाद ८४ धावांपर्यंत पोहोचवले. सूर्या सरळ बॅटने अगदी सहजतेने फटके खेचत होता. सूर्याने ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मानंतर २५ वेळा पन्नासहून अधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. सूर्याने फटकेबाजी सुरू ठेवताना ६२ चेंडूंत तिलकसह शतकी भागीदारी पूर्ण केली. सूर्याने SRH च्या गोलंदाजांसोबत छळ मांडला होता. सूर्याने ५१ चेंडूंत नाबाद १०२ धावा केल्या. त्याने षटकाराने मुंबईचा विजयही पक्का केला अन् स्वतःचे शतकही. मुंबईने १७.२ षटकांत ३ बाद १७४ धावा करून मॅच जिंकली. सूर्या ५१ चेंडूंत १२ चौकार व ६ षटकारांसह १०२ धावांवर नाबाद राहिला आणि तिलकसह ( नाबाद ३७) ७९ चेंडूंत १४३ धावांची मॅच विनिंग भागीदारी केली.
तत्पूर्वी, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी हार्दिक पांड्याचे फॉर्मात येणे भारतासाठी शुभ संकेत आहेत. त्याने SRH च्या ३ फलंदाजांना माघारी पाठवले. ३५ वर्षीय फिरकीपटू पियूष चावलाने ३ मोठ्या विकेट्स घेऊन सामन्याला कलाटणी दिली. जसप्रीत बुमराहने त्याची इकॉनॉमी कायम राखताना २३ धावांत १ विकेटे घेतली. हैदराबादकडून हेडने ३० चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ४८ धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने १७ चेंडूंत नाबाद ३५ धावा करून संघाला ८ बाद १७३ धावांपर्यंत पोहोचवले. नितिश कुमार रेड्डी ( २०), मार्को यान्सेन ( १७) यांनीही योगदान दिले.
Web Title: IPL 2024, MI vs SRH Live Marathi : Match winning 143 runs partnership between Suryakumar Yadav ( 102*) & Tilak Varma ( 37*), SKY smashed century, MI beat SRH and help other team for play off
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.