IPL 2024: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची वर्णी लागली आहे. जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएलचा सतरावा हंगाम शुक्रवारपासून सुरू होत आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने CSK चे कर्णधारपद सोडले आहे. सर्वांच्या लाडक्या माहीने अचानक कर्णधारपद सोडल्याने चाहत्यांना धक्का बसला. चाहत्यांसह आयपीएलच्या फ्रँचायझींनी धोनीच्या कर्णधारपदाच्या आठवणी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'एका युगाचा अंत', असे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीने म्हटले आहे. मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने देखील माजी कर्णधार रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांचा फोटो शेअर केला आहे. 'कर्णधार म्हणून धोनीला पाहणे खूप चांगले पण त्याचा सामना करणे खूप कठीण', अशा आशयाची पोस्ट पंजाब किंग्जने केली.
धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने पाचवेळा ट्रॉफी जिंकली. याशिवाय सर्वाधिकवेळा अंतिम फेरीत प्रवेश करणारा संघ म्हणूनही चेन्नईच्या संघाची ख्याती आहे. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांनी सर्वाधिक पाचवेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाचवेळा किताब जिंकवून दिला. पण, मुंबईच्या फ्रँचायझीने रोहितला कर्णधारपदावरून काढून ही जबाबदारी हार्दिक पांड्यावर सोपवली आहे.