Hardik Pandya Lasith Malinga Fight Mumbai Indians IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या संघात सारं काही आलबेल नसल्याचे चित्र आहे, अशी चर्चा गेले काही दिवस सोशल मीडियावर सातत्याने दिसत आहे. रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवल्यानंतर हार्दिक पांड्याला ही जबाबदारी सोपवल्यामुळे मुंबईच्या संघात दोन गट पडले असल्याचीही चर्चा रंगली आहे. रोहित शर्मा चा एक गट आणि हार्दिक पांड्या चा दुसरा गट अशा दोन गटांमध्ये संघातील खेळाडू विभागले गेले असल्याची भावना चाहत्यांमध्ये आहे. अशातच आता केवळ खेळाडूच नव्हे तर सपोर्ट स्टाफ मधील काही मंडळी देखील यातील विविध गटांचा भाग होत आहेत का? अशा पद्धतीची चर्चा काही व्हिडिओंमुळे केली जात आहे. हार्दिक पांड्या आणि संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा यांच्यातील दोन छोटे व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत. या दोन वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये घडत असलेल्या गोष्टींमुळे हार्दिक आणि मलिंगा यांच्यात सारं काही आलबेल नसल्याची चर्चा अधिक प्रखर झाली आहे.
नक्की काय आहेत ते व्हिडीओ?
दोन व्हायरल झालेल्या व्हिडिओंपेकी पहिल्या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सच्या डगआऊट मध्ये कायरन पोलार्ड आणि लसिथ मलिंगा हे खुर्चीवर बसलेले दिसतात. हार्दिक पांड्या आल्यानंतर पोलार्ड आणि मलिंगा दोघेही त्याला जागा देण्यासाठी उठतात. परंतु मलिंगा उठून निघून जातो आणि हार्दिक पांड्या त्याच्या जागी खुर्चीवर बसतो, अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे. या व्हिडिओतून चाहते असा निष्कर्ष काढताना दिसत आहेत की मलिंगा आणि हार्दिक यांच्यामध्ये काहीतरी बिनसलेलं आहे. पण खरे पाहता हा व्हिडिओ अतिशय छोटा असल्यामुळे या व्हिडिओत नक्की काय घडले आहे हे सांगणे कठीण आहे. पाहा तो व्हिडीओ-
दुसऱ्या व्हिडिओमध्ये लसिथ मलिंगा सामना संपल्यानंतर मुंबईच्या सर्व खेळाडूंना हात मिळवण्यासाठी जात असताना दिसतो. यावेळी मलिंगा हार्दिक ला जेव्हा हात मिळवताना दिसतो तेव्हा हार्दिक मात्र हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे करत नाही. हार्दिक चे अशा प्रकारचे वर्तन पाहून सोशल मीडियावर त्याच्यावर चाहत्यांकडून टीका केली जात आहे.
दरम्यान, दोनही व्हिडिओ हे अतिशय छोटे असल्यामुळे यातून कोणताही निष्कर्ष काढणे कठीण आहे. पण चाहत्यांच्या भावना लक्षात घेता हार्दिक पांड्या आणि लसिथ मलिंगा यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं आहे की काय अशी शंका मात्र नक्कीच उत्पन्न केली जाऊ शकते.