"रिश्ते में तो हम तुम्हारे कॅप्टन लगते है, नाम है पांड्या", IPL साठी मुंबईचा कर्णधार सज्ज

आयपीएलचा सतरावा हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 01:44 PM2024-03-03T13:44:31+5:302024-03-03T13:46:25+5:30

whatsapp join usJoin us
 IPL 2024 Mumbai Indians captain Hardik Pandya is all set for the upcoming season | "रिश्ते में तो हम तुम्हारे कॅप्टन लगते है, नाम है पांड्या", IPL साठी मुंबईचा कर्णधार सज्ज

"रिश्ते में तो हम तुम्हारे कॅप्टन लगते है, नाम है पांड्या", IPL साठी मुंबईचा कर्णधार सज्ज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Hardik Pandya: आयपीएलचा सतरावा हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. २२ मार्चपासून आयपीएल २०२४ चा थरार रंगणार आहे. आगामी हंगाम मुंबई इंडियन्ससाठी खूप खास असणार आहे. कारण प्रथमच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईची पलटन दिसणार आहे. पांड्याची घरवापसी झाली असून त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. मुंबईचा नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पांड्याने आयपीएलच्या तोंडावर रणशिंग फुंकले आहे. 'रिश्ते में तो हम तो तुम्हारे कॅप्टन लगते है, नाम है पांड्या' हा डायलॉग म्हणत पांड्याने आयपीएलसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.

'स्टार स्पोर्ट्स'ला दिलेल्या मुलाखतीत पांड्याने विविध बाबींवर प्रकाश टाकला. तो म्हणाला की, मुंबईच्या चाहत्यांकडून एवढं प्रेम मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचं आभार मानण्यासाठी माझ्याकडं शब्द नाहीत. मुंबई माझं घर आहे, मी बडोद्यातून इथं आलो अन् स्वप्नपूर्तीकडं वाटचाल केली. या आधी मुंबईच्या संघात होतो, पण २ वर्ष बाहेर गेलो होतो. मात्र आता घरवापसी झाली असून मुंबईच्या संघानेच मला ओळख दिली. २०१५ मध्ये आयपीएलमध्ये 'करा किंवा मरा' अशा लढतींमध्ये मी चांगली कामगिरी केली. इथूनच माझ्या क्रिकेट प्रवासाची खरी सुरूवात झाली. 

तसेच मी काय करतो हे माझ्या मुलाला माहिती नाही, तो नेहमी विचारतो की, बाहेर गेल्यावर आपल्याला सर्वजण हात का करतात. पण यंदाच्या आयपीएलमध्ये तो त्याचे बाबा काय करतात हे स्वत:च्या डोळ्यांनी बघेल. कारण तो आता ४ वर्षांचा झाला असून आयपीएलमध्ये स्टेडियमध्ये मला खेळताना पाहताना तो दिसेल, असेही पांड्याने नमूद केले. 

याशिवाय मी विक्रमांवर जास्त भर देत नाही. कुणी अर्धशतक केले कुणी शतक झळकावले याचा मी विचार करत नाही. मी विक्रमांच्या मागे धावणाऱ्यांपैकी नाही, हे असं करणं म्हणजे वेळेचा दुरूपयोग असतो असं मला वाटतं, असंही त्यानं सांगितलं. यावेळी मुंबईच्या कर्णधाराला अमिताभ बच्चन यांचा डायलॉग बोलायला सांगण्यात आले. तेव्हा पांड्यानं म्हटलं, "'रिश्ते में तो हम तुम्हारे कॅप्टन लगते है, नाम है पांड्या."
 
हार्दिकची एन्ट्री अन् कर्णधारपद 
हार्दिक पांड्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने १२३ आयपीएल सामन्यांत २३०९ धावा केल्या आहेत आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२४ च्या लिलावासाठी मुंबई इंडियन्सकडे १५.२५ कोटीच रक्कम शिल्लक होती आणि गुजरात हार्दिकला १५ कोटी देत होते. त्यामुळे मुंबईला हार्दिकला संघात घेण्यासाठी पैसे कमी पडले होते. त्यांनी १७.५ कोटींत खरेदी केलेल्या कॅमेरून ग्रीनला RCB सोबत ट्रेड करून पर्समधील रक्कम वाढवली अन् हार्दिकला मोठी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात घेतले. खरं तर मुंबईच्या संघात येण्यापूर्वी हार्दिकने एक मोठी अट ठेवली होती ती म्हणजे कर्णधारपद.

दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आपल्या पदार्पणाच्या (२०२२) हंगामातच विक्रम नोंदवला. पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातच्या संघाला पहिल्याच हंगामात किताब जिंकण्यात यश आलं. मात्र, हार्दिकच्या जाण्याने गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला. खरं तर गुजरातच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंची मोठी फळी असून शुबमन गिल व्यतिरिक्त, केन विल्यमसन, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा, विजयशंकर, साई किशोर, राशिद खान, डेव्हिड मिलर हे नामांकित खेळाडू गुजरातच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने गुजरातच्या संघाची धुरा भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिलच्या खांद्यावर सोपवली. गिलसह टायटन्सच्या सर्व खेळाडूंनी मागील दोन हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. त्यांचे नेतृत्व करण्यात हार्दिक यशस्वी ठरला. 

हार्दिकच्या नेतृत्वात भारतीय संघाची कामगिरी   
हार्दिक पांड्याने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अर्थात ट्वेंटी-२० क्रिकेटच्या सहा सामन्यांत भारतीय संघाची कमान सांभाळली आहे. या सहा सामन्यांपैकी हार्दिकने टीम इंडियाला ५ सामन्यांत विजय मिळवून दिला, तर एक सामना बरोबरीत संपला. म्हणजेच ट्वेंटी-२० मध्ये कर्णधार म्हणून हार्दिकने एकाही सामन्यात पराभवाची चव चाखलेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिकने एकूण ११ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी ८ सामन्यात संघाने विजय मिळवला आहे, तर २ सामने भारताला गमवावे लागले. 

Web Title:  IPL 2024 Mumbai Indians captain Hardik Pandya is all set for the upcoming season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.