IPL 2024, MI vs DC : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सने अखेर पहिल्या विजयाची नोंद केली. २०१४ व २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे ३ सामने गमावल्यानंतर अनुक्रमे एलिमिनेटर व जेतेपदापर्यंतचा प्रवास केला होता. आजच्या विजयाने आता मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्यानेही या पर्वातील पहिला विजय मिळवला आणि तोही आनंदीत झाला. फ्रँचायझीने कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिककडे दिल्याने रोहित शर्मा नाराज असल्याच्या आणि या पर्वानंतर संघ सोडण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर या विजयानंतर हार्दिकने अप्रत्यक्षपणे उत्तर दिले.
Fact Check: हार्दिकसाठी होणारं Boo रोखण्यासाठी MI ने १८,००० विद्यार्थ्यांना स्टेडियमवर आणले?
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने २९ धावांनी विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने ५ बाद २३४ धावा केल्या. यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाला ८ बाद २०५ धावा करता आल्या. हार्दिक म्हणाला,''आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. आम्ही मनात पक्कं केलं होतं आणि आम्ही स्वतःवर विश्वास कायम राखला होता. आम्ही रणनीतीत काही तांत्रिक बदल केले आणि आता आमचा संघ संतुलित व सेट झालेला दिसतोय. हे संघासाठी खूप महत्त्वाचे आहे. ड्रेसिंग रुममध्येही प्रचंड प्रेम मिळतंय, काळजी घेतली जातेय. एकमेकांवर विश्वास ठेवून त्याच्या पाठीशी उभे राहणे, हेच चित्र ड्रेसिंग रुममध्ये आहे.''
हार्दिकने आज १० चेंडूंत नाबाद ३९ धावा करणाऱ्या रोमारियो शेफर्डचे कौतुक केले. शेफर्डने २०व्या षटकात ३२ धावा चोपल्या आणि त्यामुळे संघ २३४ धावांपर्यंत पोहोचू शकला. गोलंदाजीत त्याने ४ षटकांत ५४ धावा दिल्या खऱ्या, पंरतु डेव्हिड वॉर्नरची महत्त्वाची विकेटही मिळवून दिली.
“प्रत्येकाचा विश्वास होता की आम्हाला फक्त एक विजय हवा आहे. आजची सुरुवात अप्रतिम होती. ६ षटकांत ७० धावा करणे, नेहमीच आश्चर्यकारक होते. संधी मिळाल्यावर प्रत्येकाने ज्या प्रकारे कामगिरी केली, हे पाहणे चांगले होते. रोमारियोची हिटिंग दमदार होती. त्याने आम्हाला सामना जिंकून दिला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असते,” असे हार्दिक म्हणाला.
Web Title: IPL 2024, Mumbai Indians Captain Hardik Pandya quashes rumours of rift with Rohit Sharma, says ‘lots of love in changeroom’
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.