Hardik Pandya Troll: हार्दिक पांड्यालामुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवल्यापासून तो प्रसिद्धीच्या झोतात आहे. अनेकांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. सध्या आयपीएलच्या (IPL 2024 News) सतराव्या हंगामाचा थरार रंगला असून मुंबई इंडियन्सने आपला पहिला सामना गुजरात टायटन्सविरूद्ध खेळला. (GT vs MI) सलामीच्या सामन्यात परंपरेप्रमाणे मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. २०१३ पासून मुंबईला एकाही हंगामात विजयी सलामी देता आली नाही. यावेळी देखील तसेच झाले आणि मुंबईने ६ धावांनी सामना गमावला. हा सामना नाना कारणांनी चर्चेत राहिला. रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढल्यामुळे चाहत्यांचा संताप दिसला. त्यांनी अनेकदा हार्दिक पांड्याला ट्रोल केले आणि आक्षेपार्ह घोषणांचा पाऊस पाडला.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यादरम्यान अतिउत्साही चाहत्यांनी हार्दिक पांड्याविरोधात घोषणाबाजी केली. त्याला ट्रोल करताना प्रेक्षकांनी पातळी ओलांडल्याचे दिसले. अशातच भारताचा माजी खेळाडू मनोज तिवारीने एक भीती व्यक्त केली आहे.
हार्दिक चाहत्यांच्या निशाण्यावर
तो म्हणाला की, आपण सर्वांनी पाहिले आहे की, ज्या पद्धतीने अहमदाबादमध्ये हार्दिकला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. ते पाहता आपण कल्पना करू शकतो की, त्याचे मुंबईत कशा प्रकारे स्वागत होईल. इथे त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागेल. कारण मुंबईचा आणि रोहितचा एक चाहता म्हणून कोणालाच हे पटलेले नाही. हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार होईल असे कोणालाच अपेक्षित नव्हते. तो 'पीटीआय' या वृत्तवाहिनीशी बोलत होता.
गुजरातचा ६ धावांनी विजय
रविवारी मुंबई इंडियन्सचा सलामीच्या सामन्यात गुजरात टायटन्सने ६ धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील लढत नाना कारणांनी महत्त्वाची ठरली. दोन्हीही संघ नवीन कर्णधारांच्या नेतृत्वात होते. गुजरातने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला इशान किशनच्या रूपात सुरुवातीलाच मोठा झटका बसला. नंतर नमनने मुंबईचा मोर्चा सांभाळत काहीसा धीर दिला. रोहित शर्माने आपल्या अनुभवाचा फायदा घेत सावध खेळी केली आणि डाव सावरला. मात्र, ही जोडी तंबूत परतल्यानंतर यजमानांनी पुनरागमन केले.
अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी १९ धावांची गरज होती. स्ट्राईकवर कर्णधार हार्दिक पांड्या होता. पहिल्याच चेंडूवर पांड्याने षटकार आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर चौकार ठोकला आणि सामन्यात रंगत आणली. आता ४ चेंडूत ९ धावांची गरज होती. पण चौथ्या चेंडूवर हार्दिक बाद झाला अन् पुन्हा गुजरातने पुनरागमन केले. मुंबईचा कर्णधार ४ चेंडूत ११ धावा करून तंबूत परतला. ३ चेंडूत ९ धावा हव्या असताना पियुष चावला बाद झाला. अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने एक धाव काढली आणि शेवटच्या चेंडूवर देखील एक धाव मिळाली. अशाप्रकारे मुंबईने ६ धावांनी सामना गमावला. यजमान संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १६२ धावा करू शकला आणि सामना ६ धावांनी गमावला.
Web Title: ipl 2024 Mumbai Indians captain Hardik Pandya will face fan fury when he comes to Mumbai, says former player Manoj Tiwary
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.