आयपीएलच्या आगामी हंगामाला सुरुवात होण्यासाठी फक्त सात दिवसांचा कालावधी उरला आहे. सतराव्या हंगामासाठी सर्वच संघ तयारी करत आहे. मुंबई इंडियन्स प्रथमच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणार आहे. मुंबईचा नवनिर्वाचित कर्णधार हार्दिकने देखील सरावाला सुरुवात केली असून त्याची झलक समोर येत आहे. श्रीलंकेचा माजी खेळाडू लसिथ मलिंगा निवृत्तीनंतर मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील झाला. मलिंगा सध्या मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. यापूर्वी तो राजस्थान रॉयल्सच्या फ्रँचायझीसोबत होता. मलिंगा मुंबईच्या शिलेदारांना गोलंदाजीचे धडे देत आहे.
मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने सराव सत्रातील एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये यष्टीरक्षक इशान किशन दिग्गज लसिंथ मलिंगाची नक्कल करत असल्याचे दिसते. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, इशान किशनलसिथ मलिंगाशी चर्चा करत आहे. यानंतर तो मलिंगाच्या गोलंदाजीची नक्कल करतो. गोलंदाजीची नक्कल करण्यापूर्वी इशानला मलिंगाची हेअरस्टाईल असलेली बनावट टोपी घालण्यात आली होती. इशानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने आतापर्यंत पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. मात्र, आगामी हंगामात हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार असणार आहे. इशान किशनची आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी पाहिली तर ती उत्कृष्ट राहिली आहे. इशानने ९१ आयपीएल सामन्यांमध्ये २३२४ धावा केल्या आहेत. या काळात त्याने १५ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट धावसंख्या ९९ आहे. २०२० चा हंगाम इशानसाठी शानदार राहिला. इशानने त्या मोसमात १४ सामने खेळताना ५१६ धावा कुटल्या होत्या. या काळात त्याला चार अर्धशतके झळकावता आली.