IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Marathi : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पैसा वसूल खेळ पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्सच्या डावातील महेंद्रसिंग धोनीने खेळलेली ती शेवटची ४ चेंडू अन् त्यानंतर रोहित शर्माचे शतक... या सामन्यात क्रिकेट प्रेमींना सर्वकाही मिळाले. त्यामुळेच या सामन्यात कोण जिंकलं, कोण हरलं यापेक्षा दोन दिग्गजांच्या खेळीने बाजी मारली हे महत्त्वाचे ठरले. CSK च्या २०६ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने सुरुवात दमदार केली होती. पण, सातव्या षटकानंतर मथिशा पथिराणाने ( Matheesha Pathirana) सामना फिरवला. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात दोन धक्के दिले, तरीही Rohit Sharma मैदानावर शड्डू ठोकून उभा होता. पण, आजचा दिवस पथिराणाचा होता. त्याने २८ धावांत ४ विकेट्स घेतल्या.
इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी मुंबईला अपेक्षित आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी ७ षटकांत ७० धावा जोडल्या. मथिशा पथिराणाने त्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इशानला ( २३) माघारी पाठवले. त्याच षटकात पथिराणाच्या बाऊन्सरवर सूर्यकुमार यादवने अपर कट मारला खरा, परंतु मुस्ताफिजूर रहमानने चतुराईने झेल टिपला. रोहित शर्मा मैदानावर उभा राहिला आणि त्याने या पर्वातील त्याचे पहिले अर्धशतक पूर्ण केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १००० हून अधिक चौकार व ५०० हून अधिक षटकार खेचणारा रोहित शर्मा हा जगातील दुसरा फलंदाज आहे. ख्रिस गेलने ११३२ चौकार व १०५६ षटकार खेचले आहेत, तर रोहितच्या नावावर १०२५* चौकार व ५००* षटकार आहेत.
रोहितची फटकेबाजी पाहून CSK चे चाहते चिंतेत पडले. त्याला तिलक वर्माने खणखणीत साथ देताना ३८ चेंडूंत ६० धावा जोडल्या. पथिराणाने MI ला तिसरा धक्का देताना तिलकला ३१ ( २० चेंडू, ५ चौकार) धावांवर माघारी पाठवले. तिलक माघारी परतला तेव्हा मुंबईला ३६ चेंडूंत ७७ धावा हव्या होत्या. तेव्हा शार्दूल ठाकूरने १६व्या षटकात २ धावा देताना सामना CSK च्या बाजूने झुकवला. त्यात १७व्या षटकात तुषार देशपांडेने ३ धावा देत हार्दिक पांड्याची ( २) विकेट मिळवली. MI च्या पारड्यात असलेला सामना या दोन षटकांनी CSK च्या बाजुने झुकताना दिसला.
टीम डेव्हिडने दोन दणदणीत षटकार खेचले खरे, परंतु मुस्ताफिजूर रहमानने त्याला ( १३) बाद केले. डेव्हिड बाद झाला तेव्हा २१ चेंडूंत ५८ धावा मुंबईला करायच्या होत्या. रोहितच्या खांद्यावर जबाबदारी होती आणि मागील सामन्यातील स्टार रोमारिओ शेफर्ड त्याला साथ देईल असे वाटलेले. पण, पथिराणा ऐकायला मानत नव्हता आणि भन्नाट चेंडूवर शेफर्डचा ( १) त्रिफळा उडवला. पथिराणाच्या त्या षटकात ६ धावा गेल्या, परंतु १ विकेट मिळाली. १२ चेंडूंत ४७ धावा मुंबईला करायच्या होत्या. मुस्ताफिजूरच्या त्या षटकात १३ धावा आल्या आणि आता ६ चेंडू ३४ धावा असा सामना CSK च्या पारड्यात झुकला. मोहम्मद नबी स्ट्राईकवर राहिल्याने MI चा पराभव पक्का झाला.
रोहितने चौकार खेचून ६१ चेंडूंत शतक पूर्ण केले. पण, २ चेंडूंत २५ धावा अशक्य होत्या. चेन्नईने हा सामना २० धावांनी जिंकला. मुंबईला ६ बाद १८६ धावा करता आल्या. रोहित ६३ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांसह १०५ धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, MS Dhoni ने शेवटच्या ४ चेंडूंत ६,६,६,२ अशी फटकेबाजी करून २० धावा कुटल्या व CSK ला ४ बाद २०६ धावांपर्यंत पोहोचवले. त्याआधी कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४० चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६९ धावा कुटल्या. त्याने तिसऱ्या विकेटसाठी दुबेसह ४५ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. दुबे ३८ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला.
Web Title: IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Marathi: Rohit Sharma's century in vain! Chennai Super Kings beat Mumbai Indians at Wankhede stadium
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.