Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: मुंबई इंडियन्सचा संघ आज लखनौ सुपरजायंट्सशी संघाविरूद्ध त्यांच्याच मैदानात सामना खेळणार आहे. लखनौच्या संघाने आतापर्यंत ९ पैकी ५ सामने जिंकले आहेत. त्यामुळे ते १० गुणांसह पाचव्या स्थानी आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाला मात्र यंदाच्या हंगामात अद्याप लय सापडलेली नाही. त्यांनी आतापर्यंत ९ पैकी केवळ ३ सामने जिंकले आहेत. त्यामुळे मुंबईचा संघ सध्या गुणतालिकेत ६ गुणांसह नवव्या स्थानी आहे. आजच्या दिवशी मुंबईच्या संघाला दमदार विजयाची गरज आहे. माजी कर्णधार रोहित शर्माला आज वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून मुंबईचा संघ विजय मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्यासोबतच 'बर्थडे बॉय' रोहित शर्मासाठीही आजचा सामना महत्त्वाचा आहे. त्याला एक महत्त्वाचा विक्रम खुणावतो आहे. जाणून घेऊया त्याबद्दल...
रोहित शर्माने आतापर्यंत मुंबई इंडियन्सच्या संघाला ५ विजेतेपदे मिळवून दिली आहेत. यंदाच्या हंगामात मात्र रोहितच्या जागी हार्दिक पांड्याची संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. असे असले तरी रोहित शर्मा सलामीवीर म्हणून आपली भूमिका चोख बजावताना दिसत आहे. आज रोहितला एका मोठा विक्रम खुणावतो आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्मा IPLच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत TOP 3 मध्ये स्थान मिळवू शकतो. लखनौ विरूद्ध मुंबईचा 'हिटमॅन' रोहित शर्माने जर ४३ धावा केल्या तर तो या विक्रमाला गवसणी घालू शकतो.
सध्याच्या घडीला सर्वाधिक धावांच्या यादीत विराट कोहली अव्वलस्थानी आहे. त्याने २४७ सामन्यांमध्ये ७,६३३ धावा केल्या आहेत. पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन दुसऱ्या स्थानी आहे. त्याने २२२ सामन्यांमध्ये ६,७६९ धावा केल्या आहेत. तर डेव्हिड वॉर्नर १८३ सामन्यांमध्ये ६,५६४ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्माने २५२ सामन्यात आतापर्यंत ६,५२२ धावा केल्या आहेत. रोहितने ४३ धावा केल्यास तो वॉर्नरला मागे टाकून top 3 मध्ये स्थान मिळवू शकतो.